जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील राजूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून नातेवाइकांच्या मदतीने आईनेच मुलीचे अपहरण केले ही घटना भोकरदन तालुक्यातील राजूर येथे गुरुवारी दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिद्धेश्वर नारायण साबळे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजूर येथील सिद्धेश्वर नारायण साबळे यांचा दीड महिन्यापूर्वी गावातीलच एका मुलीसोबत तिच्या आईच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला होता. मुलीच्या आईला हे लग्न मान्य नव्हते. सिद्धेश्वर साबळे हे आपल्या पत्नीसोबत राजूर येथील घरात राहतात. मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरून गुरुवारी दुपारच्या सुमारास मुलीची आई नातेवाइकांसह घरात घुसली. नंतर फिर्यादीच्या आईला व बायकोला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या बायकोला जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात बसवून घेऊन गेली. या प्रकरणी सिद्धेश्वर साबळे यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिस ठाण्यात संशयित भगवान शिंदे यांच्यासह मुलीची आई व तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. वैशाली पवार, फौजदार शिवाजी देशमुख हे करीत आहेत.

