नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी मोबा.न. 8369205752
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांबाबत तसेच येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी प्रलंबित विकास कामांसंदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन पत्राद्वारे निवेदन दिले. त्यावेळी माजी आमदार, संपर्क प्रमुख मिरा भाईंदर शहर विनोद घेसाळकर, लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, माजी उपमहापौर प्रवीण पाटील, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, धनेश पाटील, जयराम मेसे, शांताराम ठाकुर, राजेश सिंग (उत्तर भारतीय जिल्हा प्रमुख) माजी नगरसेवक श्री. दिनेश नलावडे, श्रीमती. ताराताई घरत, सौ. शर्मिला ताई बगाजी, जॉर्जी गोविंद, शहर प्रमुख बर्नाड डिमेलो, श्री. सतीश अंचेकर, श्री. जितेंद्र पाठक, श्री.लक्ष्मण कांदळगांवकर, उपशहर प्रमुख श्री. आर. सी.सावंत, श्री.सेबी फर्नांडिस, श्री. केसरकर, श्री. अशोक मोरे (उत्तन), महिला उपजिल्हा संघटक सौ.जयलक्ष्मी सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख श्री.पवन घरत, व उपस्थित विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्लस्टर योजना – सर्वप्रथम मीरा भाईंदर शहरात क्लस्टर योजना राबवीत असताना मीरा भाईंदर शहरातील गावठाण भाग तसेच समुद्र किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या कोळीवाड्यातील घरे व शेतकऱ्यांची घरे ही सर्व गावे क्लस्टर मधून वगळण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर आयुक्तांनी अनुकुलता दर्शवून ती सर्व गावठाणामधील घरे वगळण्यात येतील असे आश्वासन दिले.
अनधिकृत बांधकाम नोटीस – नुकताच मीरा भाईंदर शहरातील शासकीय जमिनीवर असलेल्या घरांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूमी अभिलेक विभागाकडून सर्वे सुरु झाला असून त्यांना सन २००० पूर्वीचे वास्तव्याचे पुरावे जमा न केल्यास बांधकाम निष्कासित करण्यात येईल अशा नोटीसा बजाविण्यात आल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आयुक्तांनी नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही ज्यांची घरे पूर्वीपासून आहेत व ज्यांनी अनधिकृत बांधकाम करून हॉटेल लॉज उभे केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.
घोडबंदर किल्ला ते शिवसृष्टी रस्ता – घोडबंदर किल्ला ते शिवसृष्टीकडे जाणाऱ्या ९ मीटरचा प्रस्तावित केलेल्या रस्त्यात बाधित होणाऱ्या २५ लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाची विचारणा केली खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांना या घोडबंदर किल्ल्याचे ज्यांनी जतन केले त्याच मावळ्यांना तुम्ही बेघर करीत आहात हा कोणता न्याय ? असा जाब विचारला. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून हा रस्ता बनवीत असाल तर तेथील नागरिक विरोध करतीलच परंतु या नागरिकांना बाधित न करता या शिवसृष्टीच्या मागून दुसरा पर्यायी रस्ता होत असेल तर त्याचा विचार प्रथम करावा. आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून योग्य निर्णय देऊ असे सांगितले.
रस्त्यावरील खड्डे भरणे – शहरात विकास कामे सुरु असताना रस्त्यात पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. भाडे वाढ – मीरा भाईंदर शहरात उभारण्यात आलेल्या सभागृहाचे भाडे दुपटीने वाढविण्यात आले आहेत. तसेच मालमत्ता करात १० टक्के आकारलेला रस्ता कर याचा भूदंड नागरिकांना का ? असा सवाल खा. विचारे यांनी आयुक्तांना केला.
पाणी समस्या – मीरा भाईंदर शहरात मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी एम एम आर डी ए मार्फत सूर्या धरणातून पाणी मिळविण्यासाठी जलवाहिनीचे काम पूर्णत्वास आले असताना शहराअंतर्गत जलवाहिनीचे काम तत्काळ सुरु करा अशी मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी यासाठी राज्य शासनाकडून ५१६ कोटी निधी मंजूर झाला असून त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर याचे काम तत्काळ सुरु करू व एक ते दीड वर्षात याचे काम हि पूर्ण करू. तसेच नवघर परिसरात अपुऱ्या होणाऱ्या पाणी पुरवठ्या बाबत मध्यंतरी पाहणी करून जल वाहिनीसाठी १७ कोटी मंजूर करून घेतले होते. या कामाची विचारणा केली असता. याचे काम पूर्णत्वास येत आहे.
अपूर्ण राहिलेले जोडरस्ते – भाईंदर व मीरा रोड पूर्व व पश्चिम बाजूस रूळालगत जोडरस्ते एकमेकांना जोडण्यासाठी आपण पुढाकार घेऊन हे रस्ते मार्गी लावावेत. त्यामुळे नागरिकांना सोयीचे होईल.
मच्छी मार्केट – मच्छीमारांसाठी भांडार पश्चिम स्थानकाशेजारी घाऊक मासळी बाजार निर्मितीसाठी जागा आरक्षित करावी जेणेकरून विक्रेते व ग्राहकांना प्रवासाच्या दृष्टीतून सोयीचे पडेल अशी मागणी करण्यात आली. यावर आयुक्तांनी याचे आरक्षण डीपी मध्ये करण्यात येईल असे सांगण्यात आले.
डीम कन्व्हेन्स – मीरा भाईंदर शहरात नवीन इमारतींना बांधकाम परवानगी देताना मोफा कायद्यानुसार ३ किंवा ६ महिन्यात सदर इमारतीला विकासकाने डीम कन्व्हेन्स देणे सक्तीचे करण्याची अट घालण्यात यावी व त्यानंतरच बांधकाम परवाना देण्यात यावा अशी मागणी केली. तसेच शहरातील बहुतांश इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसल्याने अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत यासंदर्भात योग्य निर्णय घेऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती करण्यात आली.
नाले साफ सफाई व वृक्ष छाटणी – येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले साफ सफाई व झाडांची छाटणी योग्य रीतीने करून घ्यावी. जेणेकरून पावसाळ्यात होणारी दुर्घटना टाळता येईल.
डम्पिंग ग्राउंड – उत्तन परिसरात मीरा भाईंदर शहरातील सर्व कचरा ज्याठिकाणी डम्पिंग केला जातो. त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने दरवर्षी पावसाळ्यात सर्व कचरा शेतात येवून साचतो. तसेच साचलेल्या कचऱ्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई पसरते. त्यामुळे यावर ठोस निर्णय घेऊन उत्तन वासियांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली. त्यावर आयुक्त दिलीप ढोले यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीन उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. येत्या ३ महिन्यात सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
नाट्यगृह – नव्याने उभारण्यात आलेल्या नाट्यगृहात अपुऱ्या होणाऱ्या सोई – सुविधांच्या अभावामुळे विचारणा केली असता संस्थांसोबत पाहणी करून अपुऱ्या सोयी सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच व्यापारी, बेरोजगार झालेले कामगार, अशा व इतर समस्यांवर चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांना दिल्या.

