✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जागतिक तंबाखु नकार दिनानिमित्त जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नुकतेच झाले. सदर शिबिर प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नारलावार व जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक गृह सत्यजित आमले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक संजय गायकवाड, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालय व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिकारी व कर्मचा-यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात मौखिक आरोग्य तपासणी, मुख कर्करोग तपासणी, आरोग्य तपासणी, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी तसेच विविध रक्त रक्त तपासण्या करण्यात आल्या.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाढती संख्या लक्षात घेता उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, हृदयविकार, कॅन्सर यासारखे आजार हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होत असतात.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असतो. जो शरीराला हानिकारक ठरतो. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण हे लहान मुलांमध्ये वाढत आहे. यासाठी सदर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, आरएसबीके चमू, महालँब यांची चमू तसेच शरद पवार दंत महाविद्यालय, सावंगी मेघे येथील डॉ. स्वप्नील मोहोड व त्यांची चमू उपस्थित होती, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

