✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आदीवासी समाजातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्या सोबतच त्यांच्या कल्याणाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येते. भूमिहीन दारिद्यरेषेखालील नागरिकांना हक्काची शेतजमीन उपलब्ध होण्यासाठी सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविली जात आहे. याशिवाय त्यांना हक्काचे घरकुल उपलब्ध व्हावे तसेच आदिवासींच्या वस्तीत विकासाची कामे करण्यासाठी विविध योजनांचा समावेश आहे.
आदिवासींमधील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटूंबांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा तसेच रोजगारासाठी त्यांचे परराज्यात होणारे स्थलांतरण थांबविण्यासाठी भूमिहीन कुटूंबास जमीन देण्याची योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 4 एकर जिरायत अथवा 2 एकर बागायत यापैकी जी जमीन वाटपासाठी उपलब्ध असेल ती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी लाभार्थी भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर अनुसूचित जमातीचा असावा, दि.1 जानेवारी 2000 रोजी भूमिहीन असणारा आदिवासी लाभ घेण्यास पात्र, लाभार्थीचे वय किमान 25 व कमाल 60 वर्षे असावे, महसुल व वनविभागाचे गायरान व अतिरिक्त जमिनीचे वाटप केलेल्या कुटूंबांना योजनेचा लाभ दिला जात नाही. आदिम जमाती, विधवा स्त्रिया, परितक्त्या स्त्रिया यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. जमिनीची विक्री अथवा हस्तांतरण करणार नाही व इतर अनुषंगिक शर्ती अटीचे पालन करील याबाबत लाभार्थ्यांना करारनामा लिहून द्यावा लागतो.
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम
राज्यातील ग्रामीण, नागरी भागातील अनुसूचित आदिवासी क्षेत्र, अतिरिक्त आदिवासी क्षेत्र, माडा, मिनीमाडा क्षेत्र, प्रस्तावित माडा, मिनीमाडा क्षेत्र तसेच आदिवासी उपयोजनाबाह्य क्षेत्रातील 50 टक्केपेक्षा जास्त आदिवासींची लोकसंख्या असलेल्या वस्त्या, पाडे, वाड्यांमध्ये सामुहिक विकासाच्या सुविधा पुरविण्यासाठी ही योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत मुख्य वस्तीपासुन जोडरस्ते, सिमेंट कॉक्रिट, डांबरीकरणाचे अंतर्गत रस्ते, शाळेचे कम्पाऊंड, पिण्याचे शुध्द पाणी, जुन्या विहिरीची दुरुस्ती, बंद गटारे बांधणे, आदिवासी वस्तीचे विद्युतीकरण, समाजमंदिर, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी बांधकाम, नदीकाठ संरक्षण भिंत, घाट बांधकाम, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसचिवालय इत्यादी कामे या योजनेतून घेतली जातात.
या योजनेच्या लाभासाठी गावात दलित वस्ती सुधारणा अथवा तत्सम कार्यक्रमांतर्गत वस्ती सुधारणा झालेली नसावी, शासन निर्णयान्वये घोषित केल्याप्रमाणे या योजनेखाली एक गावासाठी कार्यक्रम संख्या राहील, प्रस्तावित माडा, मिनीमाडा क्षेत्रातील गावांसाठी एकात्मिक दृष्टीकोन ठेवुन कामे घेणे आवश्यक आहे.
शबरी आदिवासी घरकुल योजना अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील परिवारांना घरकुल बांधून देणे तसेच पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते. योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा, तसेच पारधी घरकुल करीता पारधी जमातीचा असणे आवश्यक आहे. बांधकामासाठी पुरेशी जागा असावी. सोबतच उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, गांव नमुना-8 अ, ग्रामसभा ठरावाची प्रत, आधारकार्ड, बॅंकेच्या पासबुकची झेराक्स प्रत असणे आवश्यक आहे.

