प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जिल्ह्यातील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे देण्याकरीता वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनावर उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याने भेटीला गेलेल्या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले आहे.
वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. भेटीदरम्यान संघर्ष समिती सोबत सर्वपक्षीय नेते आणि स्थानिक सामजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. यादरम्यान शिष्टमंडळातील सदस्यांनी सुमारे १५ मिनिट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून हिंगणघाट शहरात वैद्यकीय महाविद्यालयाचे महत्व विषद केले. हिंगणघाट हा सर्वात मोठा तालुका असून राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे लाईनशी जोडलेला आहे तसेच हिंगणघाटच्या सीमा लगत तेलंगाना राज्य, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग जुळलेला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी तहसील असून येथील लोकसंख्या ही सुमारे दीड लाखाच्या जवळपास आहे. तसेच परिसरातील गावातील पाच ते सहा लाख लोकांचा हिंगणघाट सोबत थेट संबंध आहे. शैक्षणिक दृष्ट्याही हिंगणघाट मागासलेले आहे. येथे उच्च शिक्षणाच्या कोणत्याही सोयी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यात उदासीनता निर्माण झालेली आहे, असा विषय माजी आमदार राजू तिमांडे आणि अतुल वांदिले यांनी मांडला. त्याचप्रमाणे हिंगणघाट येथील गरजू रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागले आहे. शिष्टमंडळातील सदस्या सुरेखा देशमुख यांनी गरोदर मातेचे प्रमाण तहसील मध्ये अधिक असल्याचे सांगून त्यांना उपचारासाठी सेवाग्राम आणि सावंगीला पाठविण्यात येतात. वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकदा बाळ अथवा माता दगावण्याचे प्रकार येथे घडलेले आहे, हा महत्वाचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर व्यक्त केला.
हिंगणघाट शहरात दोन मोठ्या कापड गिरण्या बंद पडल्याने बेरोजगाराची संख्या वाढलेली आहे. हिंगणघाट शहरात रोजगाराच्या निमित्त शासकीय महाविद्यालय हा महत्वाचा विषय आहे. आदी महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे देण्याबाबत आग्रही भूमिका वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केली. त्यावर उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्वांच्या भावना जाणून घेत स्थानिक आमदार कुणावार यांनीही ही भूमिका माझ्यासमोर मांडलेली आहे, असे सांगितले. मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या निवेदनाची योग्य दखल घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.
निवेदन देताना शिष्ठमंडळात संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, सचिव रुपेश लाजूरकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, जगदीश वांदिले, माजी आमदार राजू तिमांडे, प्रा. सुरेखा देशमुख, अतुल वांदिले, पंढरीनाथ कापसे, राजू खूपसरे, सतीश धोबे, गजानन कुबडे, प्रवीण उपासे, सिताराम भुते, श्याम इडपवार,संगीता कडू, सीमा मेश्राम, सिंधुताई दखणे, चंदा येलेकर, कल्पना हिवंज, विद्या गिरी, सुकेशनी वाळके, ऋषिता कांबळे, राजश्री बाळघोळे, संदेश मून, सुरेंद्र बोरकर, प्रलय तेलंग, मोहन तुमडाम, भारत पाटील, अजय मुळे आदी उपस्थित होते.
आमदारांनी सादर केलेला प्रस्ताव विचाराधीन; उपमुख्यमंत्री फडणवीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे देण्यात यावे याकरिता आमदार समीर कुणावार यांनी माझ्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर प्रस्ताव विचाराधीन असून योग्य तो निर्णय घेतल्या जाईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेटायला गेलेल्या शिष्टमंडळा दिला.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय महाविद्यालय बाबतची भूमिका जाहीर व्यक्त न केल्याने त्यावरून संपूर्ण तालुक्यात उलट सुलट चर्चा करण्यात येत होत्या. मात्र त्यांनी स्वतंत्र प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असल्याचे स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याने आता या चर्चां निष्फळ असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क करा. प्रशांत जगताप संपादक 9766445348 – 7385445348

