✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मान्सूनपुर्व तयारीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल दिवसभर भर उन्हात निम्न वर्धा प्रकल्प व प्रकल्पाचे कालवे तसेच पुलगाव व खर्डा बॅरेजची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कालवा, देवळी व गिरोली शाखा कालवे, भिडी, हुस्नापुर, पिंपळगाव, वायगाव, पाथरी, भोजनखेडा, सालोड कालवे परिसराची पाहणी केली. आर्वी उपसा सिंचन योजनेचा आढावा त्यांनी प्रत्यक्ष लाभक्षेत्राच्या ठिकाणी घेतला. कालवा प्रवाही सिंचन क्षेत्रामध्ये वाढ निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अभियंत्यांना दिले.
आर्वी उपसा सिंचन योजनेचा लाभ रब्बी हंगामात शेतकऱ्यांना देण्याकरीता कामांची गती वाढविण्याच्या सुचना देखील त्यांनी केल्या. या दौऱ्यात त्यांनी पुलगाव व खर्डा बॅरेजला भेट देत कामांचा आढावा घेतला. या प्रकल्पांची पर्यटन, मासेमारी करीता उपयोगिता वाढविण्याचे नियोजन सादर करावे. तसेच कालवा संपादीत जमिनीवरील अतिक्रणविरोधी करवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या अडचणींची सोडवणूक करण्यात यावी. अर्धवट कामे पुर्ण करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची सुचना त्यांनी केली. पाटचारी, लघु कालवे सुस्थितीत ठेवण्याकरीता शेतकरी पाणी वापर संस्थांसोबत कार्यशाळा घेऊन जनजागृती कार्यक्रम घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भिडी येथील पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष अजय झाडे, शेतकरी प्रवीण डहाके यांच्यासोबत चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रवि वऱ्हाडे, निम्न वर्धा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता रविशंकर हरनखेडे, उपअभियंता सचिन गाडे, शशिकांत सदाफळे, पवन पांढरे, सचिन चोकसे, शाखा अभियंता प्रविण शंभरकर, संकेत लोखंडे यांच्यासह शेतकरी, पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

