संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथील येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चक्क रुग्णालय परिसरात महिला डॉक्टरच्या वेशात वावरताना एका बुरखा परिधान करणाऱ्या युवकाला पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्या आहे. जावेद शेख शफी शेख असं अटक करण्यात आलेल्या युवकाचा नाव आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
मागील 10 – 12 दिवसांपासून नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात एक बुरखा घालून महिला डॉक्टर वावरताना दिसत होती. ही बुरखाधारी महिला डॉक्टर रुग्णालयातील पुरूष रुग्ण आणि त्यांच्या पुरूष नातेवाईकांशी बोलायची आणि त्यांचे मोबाईल नंबर घ्यायची. ही नवीनच बुरखाधारी महिला डॉक्टर वार्ड तसेच रुग्णालय परिसरात फिरताना दिसून आली. तिच्या हालचालीही संशयास्पद वाटल्यानंतर तिला सुरक्षा रक्षकांनी हटकलं आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. जेव्हा तहसील पोलिसांनी त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली. त्यावेळी ती बुरखाधारी महिला नसून युवक असल्याचं समोर आलं.
दरम्यान, रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला कर्मचाऱ्यांना त्या कथित बुरखाधारी महिला डॉक्टरवर संशय आला. अखेर बुधवारी त्यांनी तिला थांबवलं आणि जवळच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणून तिची चौकशी केली. त्यावेळी मात्र धक्कादायक प्रकार समोर आला. बुरखा घातलेली व्यक्ती महिला नसून पुरूष असल्याचं समोर आलं.
बुरखा घालून महिला डॉक्टरचा वेश करणाऱ्या जावेद शेख याने हे कृत्य का केलं ते मात्र अजून पर्यंत समोर आलेलं नाही. मात्र, तो फक्त पुरुषांशी बोलायचा, पुरुषांचेच मोबाईल क्रमांक घ्यायचा, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा संशय आणखी बळावला आहे. याप्रकरणी आणखी चौकशी सुरू आहे.
आरोपी जावेद शेख हा नागपूरमधील ताजबाग परिसरात राहतो. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळून तीन मोबाईल जप्त करण्यात आले. हे मोबाईल चोरीचे आहेत काय? त्याने ते कुठून आणले? याचा तपास करण्यात येत आहे. तसेच तो रुग्णालयात वेषांतर करून येण्यामागचं कारणंही शोधण्यात येत असल्याचं पोलीस निरीक्षक विनायक घोले यांनी सांगितलं. तसेच मुलं चोरण्यासाठी तर हा तरुण रुग्णालयात येत नव्हता ना? याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

