पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यस्था बिघडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात आता पुणे पोलिसांनी शहरात वाढती गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी धडक कारवाई सुरू केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच पुणे शहरात सहकार नगर परिसरात काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. पुणे शहराबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील गाड्या फोडीचे सत्र सुरू झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली घरकुल परिसरात दोन व्यक्तींनी दारूच्या नशेत चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने चिखली घरकुल परिसरात खळबळ उडाली असून गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली घरकुल आणि शरद नगर परिसरात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दोन व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आल्या. त्यांनी हातात कोयते घेऊन येथील चारचाकींसह आठ ते दहा वाहनांची नाहक तोडफोड केली. वाहने फोडल्या नंतर त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनेची दखल घेत अल्ताफ बाबू शेख व सोमनाथ गडदे दोघेही राह – हरगुडेवस्ती, चिखली या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
भरदिवसा चार चाकी गाडी फोडून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत वाहनांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही सर्व घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील कोयता गँग सक्रिय झाल्याचे आता पाहायला मिळत आहे. पुणे शहरात सलग दोन ते तीन दिवस वाहने फोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये देखील नागरिकांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकार घडल्याने कोयता गँग आता पुन्हा सक्रिय होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सदरची कारवाई देहुरोड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त पदमाकर घनवट, चिखली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र बर्गे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वाहन चोरी पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद, पोहवा साकोरे, पोहवा पांढरे, पोहवा नागरे, पोना. राठोड, पोना. गायकवाड, पोना / १८१३ सुतार, पोना. पिंजारी, या प्रथकाने केली आहे.

