हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नेहमी विवादित वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या संभाजी भिडे यांच्या नियोजन बैठकी दरम्यान मोठ्या प्रमाणात राडा झाला आहे. संभाजी भिडे यांच्या जिल्हा प्रवेश आणि बैठकीला उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध करून ही बैठक उधळून लावण्याचा जोरदार प्रयत्न केला.
चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवन परिसरात नेहमी वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडे यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र संभाजी भिडे यांच्या चंद्रपूर जिल्हा प्रवेश व बैठकीला उलगुलान संघटना व आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध केला. हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन व खडा पहारा संदर्भात असलेली भिडे यांची ही नियोजन बैठक उधळून लावण्याचा इशारा देत उलगुलान संघटना व आंबेडकरवादी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते बैठकस्थळी पोहचून या कार्यक्रमाचा निषेध करायला सुरुवात केली.
यावेळी उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाजात तेढ वाढवणाऱ्या अशा संभाजी भिडे यांच्या बैठक स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी दोन्हीकडून जोरदार नारेबाजी झाली.
यानंतर चंद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावत नारेबाजी करणाऱ्या उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. चंद्रपुरात घटनाविरोधी -देशविरोधी संभाजी भिडे यांचे नियोजन हाणून पाडणार असल्याचा निर्धार विरोधी कार्यकर्त्यांनी अटकेनंतर व्यक्त केला. भिडे गुरुजींची नियोजन बैठक मात्र पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार सुरू झाली आहे.

