संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे कस्टम विभागाने कारवाई केली आहे. तब्बल 24 कोटी किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे नागपुर येथे ड्रग्जच्या जाळात तरुण तरुणीला फसवल्या जात आहे.
हे ड्रग्ज केनिया येथून नागपूरमध्ये आणण्यात येत होते. पण नागपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळावरच कस्टमने कारवाई करत हे ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी दीपक नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर एका नायजेरियन व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, केनिया या देशातील नौरोबी येथून दुबई मार्गाने नागपूर येथे विमानाने एक व्यक्ती ड्रग्ज घेऊन येत होती. या व्यक्तीने एका लोखंडी बॉक्समध्ये ड्रग्ज लपवून आणले होते. पण त्याचा नागपूरमध्ये ड्रग्ज आणण्याचा हा प्रयत्न फसला. कारण नागपूर विमानतळावर उतरताच तपासणी करत असताना या व्यक्तीला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. दीपक नावाच्या या इसमाकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 3.7 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त केले.
यावेळी कस्टम विभागाने अँम्फेटामाइन नावाचे प्रतिबंधित असलेले ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल 24 कोटी रुपये इतकी आहे. या व्यक्तीविरोधात ही कारवाई केल्यानंतर दिल्लीतील एका नायजेरियन व्यक्तीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूरमध्ये ड्रग्ज आणण्याचा हा डाव कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावला. पण हे ड्रग्ज ही व्यक्ती कोणाच्या सांगण्यावरुन घेऊन आली होती आणि कोणाला हे ड्रग्ज विकण्यासाठी आली होती याप्रकरणाचा तपास सुरु आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या ड्रग्जचे कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कस्टमचे अधिकारी त्या अँगलने देखील तपास करत आहेत.

