मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हा तील अहेरी तालुक्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील शासकीय कार्यालयात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दप्तर दिरंगाईमुळे वैतागलेल्या अहेरी उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी स्वतःच्याच कार्यालयाला कुलूप ठोकून नायब तहसीलदारांसह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर त्रस्त नागरिकांनी वाघमारे यांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभाग मागील काही वर्षांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. त्यात परिसरातील नागरिकांना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे कार्यालयीन कामासाठी हेलपाटे मारावे लागत होते. परिणामी अनेक कामे खोळंबली होती. महिनाभरापूर्वी वैभव वाघमारे हे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू होताच कार्यालयाला शिस्त लावण्याच्या बराच प्रयत्न केला. परंतु कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.
त्यामुळे उपविभागीय अधिकारी वाघमारे यांनी सोमवारी स्वतःच्याच कार्यालयाला कुलूप ठोकून शिपाई वगळता नायब तहसीदारांसह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला पण अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नेमके किती कर्मचारी व अधिकारी निलंबित झाले याविषयी सविस्तर माहिती कळू शकली नाही.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

