राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शहरातील पवई भागातून रविवारी एक खळबळजनक घटना समोर आली होती. येथे एका 24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओगर यांची तिचा राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही घटना समोर येताच संपूर्ण परीसरात एकच खळबळ माजली होती. रुपल ओगर हिच्या मारेकराला शोधण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम राबवत हत्येचा उलगडा केला.
24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओगर हिच्या हत्येच्या आरोपीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आलं आहे. ही हत्या सफाई कामगाराने केली असून पोलिसांनी त्याच्या अंगावर असलेल्या जखमांच्या आधारे या हत्येचा उलगडा केला. मात्र ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली होती की आणखी काही उद्देश त्यामागे होता याचा तपास सुरू आहे.
24 वर्षांची रुपल ओगर हीचे स्वप्न अवघ्या काही दिवसात पूर्ण होणार होतं. ती तिचे प्रशिक्षण पूर्ण करून एअर इंडियात फ्लाइट अटेंडंट म्हणून रुजू होणार होती. पण दुर्दैवाने तिची हत्या करण्यात आली. रुपल ही छत्तीसगडची रहिवासी होती जी गेल्या सहा महिन्यांपासून तिची बहीण आणि मित्रासोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. पवई एन जी कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ती राहत होती. रुपलची बहीण आणि मित्र गावी गेले होते आणि ती सध्या एकटी राहत होती. रविवारी 12 वाजल्यापासून तिचे कुटुंबीय तिच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पण रुपलने फोनवर उत्तर न दिल्याने कुटुंबीयांनी रुपलच्या एका मित्राशी बोलून रुपलची माहिती घेण्यास सांगितले.
रात्री 10.30 वाजता रुपलचा मित्र तिच्या घरी पोहोचला. तिने दार न उघडल्याने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला तेव्हा आत रूपलचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 100 नंबर डायल करून पोलिसांना बोलावण्यात आले आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला. पवई पोलिसांनी या प्रकरणात भा द वि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने सुरू केला. पवई पोलिसांनी आठ विविध पथकं तयार केले होते आणि तांत्रिक मदतीच्या आधारे तपास सुरू केला. या प्रकरणी सुमारे 30 ते 35 जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. ज्यामध्ये बिल्डिंगचे सेक्रेटरी, सेक्युरिटी आणि इतर लोकांचे जबाब घेण्यात आले होते.
मात्र आरोपीच्या अंगावर असलेल्या जखमाने पोलिसांना संशय आला आणि त्याची सखोल चौकशी केली गेली. चौकशी दरम्यान त्याने हत्या केल्याचं कबुल केलं. रविवारी सकाळी ही घटना घडल्याचं पोलिसांनी माहिती दिली.
आरोपी विक्रम अटवाल वय 35 वर्ष याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली असून, आरोपीही पवईचा रहिवासी आहे. त्याची पत्नीही इमारतीतील कचरा उचलण्याचे काम करते. तपासाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी सोसायटीतील सर्व सीसीटीव्ही गोळा केले आणि आरोपी रक्तबंबाळ होऊन पळत असलेल्या ठिकाणाचीही तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तांत्रिक शैलीत त्याची माहिती जाणून घेत त्याचे लोकेशन ट्रेस करून त्याला सहज पकडले.

