उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरज:- आर्मी मध्ये सैनिक म्हणून नोकरी करीत असताना आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी जसं लढला,कुर्बानी दिली तसंच आत्ता आपल्या समाजाच्या हितासाठी आपण लढलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे याचा विसर पडू देऊ नका. असे आवाहन उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी केले. ते मिरज अंकली रस्त्यालगत असलेल्या राजपूत गार्डन येथे १ आक्टोबर महार रेजिमेंट ८३ व्या स्थापना दिनाच्या माजी सैनिकांच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी उद्योगपती सी.आर. सांगलीकर म्हणाले सर्वस्व पणाला लावून देशाच्या सुरक्षेसाठी लढलात, तसं आपल्या समाजासाठी लढलं पाहिजे. देशात आपला समाज ही आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. माजी सैनिकांच्याकडे आत्ता भरपूर वेळ आहे आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे, याचा उपयोग समाज सुधारण्याच्या कामासाठी केला पाहिजे. तसेच डाॅ.बाबासाहेबांचे विचार आचरणात आणले पाहिजे. त्यांनी आपणास बुद्ध धम्म दिला आहे. भारत बौद्धमय करण्याचं त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्व माजी सैनिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे काम कोणा एकट्याचं नाही. माजी सैनिकांनी घरात समानतेची वागणूक दिली पाहिजे. आर्मी कायद्याप्रमाणे फक्त आदेश देण्याचं काम करू नये. मुलगा मुलगी असा भेद न करता सर्वांना दर्जेदार शिक्षण द्यावे असा सल्ला ही दिला.
सी.आर. सांगलीकर यांनी गुगवाड येथे “धम्मभूमी” महाविहार बांधले आहे त्या विषयी त्यांनी माहिती दिली. धम्मभूमी येथे समाजोपयोगी सर्व उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी या समारंभासचे अध्यक्ष आॕ. कॅप्टन देवाप्पा वाघमारे, कार्याध्यक्ष सु.मे.आॕ. कॕ. महादेव गायकवाड, प्रमुख वक्ते अंबादास शिंदे, आॕ.सु.मे.गणपती पाखरे, सु.मे.आॕ.ले. आकाश कांबळे यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सांगली,कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातून येथून माजी सैनिक व त्यांचे सर्व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भोजनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

