हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर ७ ऑक्टोबर: – शहरातील विविध भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या प्रसंगी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध चंद्रपूर महानगर पालिकेने तक्रार करून गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे तासन्तास ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातीही घडतात. महानगर पालिकेकडून अनेकदा कारवाईही केली जाते. परंतु तरीही सदर समस्या वाहतुकीला डोकेदुखी ठरत असल्याने मोकाट जनावरांविषयीचा प्रश्न आयुक्त विपीन पालीवाल यांनी गांभीर्याने घेतला असुन सध्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहर व लगत परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे आहेत. जनावरांचे काही मालक हे जनावरे सकाळी मोकाट सोडून देतात. सोडून दिलेली ही मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. बहुतांशी मुख्य रस्ते,चौक येथे मोकाट जनावरांनी रस्ता अडविलेला असतो. यातून अनेकदा गंभीर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवते.

