🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
अल्लीपूर:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आज मुली व महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत नाही. अशीच एक संतापजनक घटना एका हिंगणघाट तालुक्यांतील एका गावातून समोर आली आहे. नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी बापाविरुद्ध अल्लीपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील रहिवासी नराधम बाप मागील तीन वर्षांपासून त्याच्या १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करीत आहे. पीडिता ही बारावीत शिकत असून, तिने याबाबतची माहिती तिच्या शाळेतील शिक्षिकेला सांगितली.
शिक्षिकेने घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ जिल्हा बाल संरक्षण समिती व चाइल्ड लाइन केंद्राला याबाबत कळविले. चाइल्ड लाइनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, वैशाली मिस्कीन यांनी थेट अल्लीपूर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तत्काळ याप्रकरणात पीडितेच्या बयाणावरून नराधम बापाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे करीत आहेत.