अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- २६/११ मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण झाली असताना मुंबईच्या आणि देशाच्या रक्षणार्थ लढलेल्या शूरवीरांच्या स्मरणार्थ या “शौर्या तुला वंदितो” या सन्मान सोहळ्याचे आयोजन दादर येथील वनमाळी हॉल येथे सह्याद्री प्रतिष्ठान- मुंबई विभागातर्फे करण्यात आले होते.
प्रत्यक्ष हल्ल्यात लढताना वीरमरण पत्करलेल्या वीरांच्या कुटुंबीयांचा आणि सध्या हयात असलेल्या शूरवीरांचा सन्मान करून त्यांच्या अतुलनीय शौर्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यात प्राधान्याने Indian Army, मुंबई पोलीस, अग्निशमन कर्मचारी तसेच कामा हॉस्पिटल येथील रुग्णसेविकांचा सन्मान करण्यात आला.
मुंबई पोलीस विभागातून वीरपत्नी स्मिता विजय साळसकर, वीरपत्नी तारा तुकाराम ओंबळे, हेमंत बावधनकर (व.पो. नि.), संजय अनंत पाटील (हवालदार), संरक्षण शाखेचे विक्रम तानाजी निकम आणि अशोक मुरलीधर शेळके, पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि सहपोलीस उप निरीक्षक मंगेश अनंत नाईक आदींचा सन्मान करण्यात आला.
मुंबई अग्निशमन दलामधून केंद्र अधिकारी एस. डी. सावंत, ए. व्ही. परब, एच. व्ही. गिरकर यांचा तसेच सहकेंद्र अधिकारी एम.व्ही. सावंत, सी. व्ही. भोसले आणि अनंत कुशाबा नांगरे, मोहम्मद झझिझ शेख, युवराज धनाजीराव पवार, राजेश भास्कर राणे, महिंद्रा भीमराव खरात आदींना गौरवण्यात आले.
कामा हॉस्पिटलमधील कर्मचारी परिचारिका प्रमुख जयश्री दीपक कुरधुण्डकर, मीना रविन्द्र जाधव, तसेच परिचारिका योगिता बागड यांची उपस्थिती लाभली तसेच त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच विशेष सन्मान म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी सुनिल सुरेश होरंबे, पर्वतारोही सुबोध गांगुर्डे, गिरीकन्या अन्वी घाटगे या वेगळ्याच ध्येयाने झपाटलेल्या विक्रमवीर तरुण व चिमुकलीचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सन्मानार्थी असलेल्या काही वीरांकडून २६/११ च्या आठवणींना आणि त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाला उजाळा देण्यात आला आणि त्यातून प्रेक्षकांना प्रेरणादायी विचार प्राप्त करता आले. सामान्य माणूस, सामान्य कर्मचारी संकट आल्यावर वेळेप्रसंगी कशाप्रकारे हिरो बनून नागरिकांचे प्राण वाचवू शकतो आणि दहशतवाद्यांचे डाव उलटवून लावू शकतो याची प्रेरणा सर्वांना घेता आली. संकटसमयी आपल्या माणसांचे जीव वाचविण्यासाठी एके-४७ घेऊन निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना दोन हात आणि एका काठीने धैर्याने तोंड देणाऱ्या पोलीस बांधवांच्या, भारतीय सैन्य दल, अग्नीशमन दलाच्या आणि कामामधील रुग्ण सेविकांच्या शौर्यगाथा ऐकण्याचे भाग्य उपस्थितांना लाभले.
या कार्यक्रम प्रसंगी पर्वतारोही सुबोध गांगुर्डे यांनी सायकलवरून ३७१ किल्ल्यांची भ्रमंती करून गोळा केलेल्या किल्ल्यांवरील पवित्र मातीचे दर्शन सर्वांना घेता आले. या कार्यक्रमात काही विशेष पाहुणे म्हणून भारतीय सैन्य जवान गणेशकुमार पडेलकर यांची विशेष उपस्थिती होती.तसेच अलर्ट सिटिझन फोरम या संस्थेचे निरंजन आहेरतसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सचिन शेडगे सर यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी २६/११ च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व हुतात्मा वीरांना नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि राष्ट्रगीत, राज्यगीत गायले गेले तसेच वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानच्या विविध विभागातील सदस्यांची उपस्थिती लक्षवेधी होती यात प्रामुख्याने पेण, पनवेल, मावळ, कोल्हापूर, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, खेड, इंदापूर, वसई- विरार, अंबरनाथ या विभागांचा समावेश होता.

