रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परतूर मधील भारतीय स्टेट बँकेला भेट दिली. बँकेचे कामकाज कसे चालते हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. बँकेमधील अधिकाऱ्याची धावपळ, ठेवीदार व खातेदारांशी होणारा त्यांचा संवाद समजून घेण्यात विद्यार्थी रमले.
शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती होण्यासह बदलत्या बँकिंग प्रणालीची ओळख होण्यासाठी बँक भेटीचा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार काळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल सावजी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना बँकिंग कामकाजाची माहिती दिली. लोकांचा पैसा सुरक्षित ठेवून त्याचा परतावा ठेवीदारांना देणे, तसेच पात्र लोकांना वित्त पुरवठा करून अर्थकारणाला चालना देणे अशी कामे बँकेमार्फत प्रामुख्याने होतात.
बँकिंग हा अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ असून भरभक्कम आर्थिक स्थिती व चांगला कारभार करणाऱ्या बँका राष्ट्राच्या आर्थिक योगदान देत असतात असे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले . कोर बँकिंग प्रणाली, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, डिजिटल बँकिंग, आधीची माहिती त्यांनी दिली. बँकेचे डेप्युटी ब्रांच मॅनेजर मनोहर गावडे यांनी बँकेच्या सर्व विभागाच्या कामकाजाची माहिती देत बँकेच्या विविध सुविधांविषयी प्रेझेंटेशन केले.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल सावजी आणि क्षेत्र अधिकारी प्रवीण दुधाट यांनी विद्यार्थ्यांनी बँकेच्या कार्यपद्धती विषयी विचारलेले प्रश्नांचे निरसन केले. शाळेच्या सचिव मीनाक्षी काळुंके, मुख्याध्यापिका लंका भवर, शिक्षक वर्गामध्ये पुरुषोत्तम मगर, शेषनारायण बिल्लारे, सुरज पहाडे, निकिता खालापुरे, अरुण चंदने, पौर्णिमा गायकवाड इत्यादी कर्मचारी वर्गाने या उपक्रमास उपस्थिती दर्शवली.

