प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट येथून 6 ऑक्टोबर 2020 ला एक संतापजनक घटना समोर आली होती. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली होती. आरोपी सुरज राजकुमार पाटील रा.हिंगणघाट याने दुपारच्या सुमारास एका अल्पवयीन मुलास स्वतःच्या घराचे छतावर नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल होते.
हिंगणघाट येथील जिल्हा सत्र न्यायाधीश वर्षा बी. पारगावकर यांनी आरोपी सुरज राजकुमार पाटील वय 27 वर्ष याला कलम 377 भादंवी व सहकलम पोस्को अन्वये 20 वर्ष सश्रम करावासासह दहा हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी सुरज राजकुमार पाटील रा.हिंगणघाट याने ६ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी एका पीडित मुलास स्वतःच्या घराचे छतावर नेऊन त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांकडे नोंदविण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवित प्रकरण तपासावर ठेवले होते.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी केला. आरोपीविरुद्ध सर्व पुरावे उपलब्ध झाल्याने प्रकरण येथील सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता दीपक वैद्य यांनी न्यायालयीन कामकाज सांभाळले. शासनातर्फे एकुण दहा साक्षदार तपासण्यात आले. शासन पक्षाची बाजू दीपक वैद्य यांनी मांडली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद घेतल्यानंतर विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा पारगावकर यांनी आरोपी याला कलम 377 भादंवी व सहकलम पोस्को अन्वये 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, सोबतच दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

