मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र
संदेश न्युज !ऑनलाईन हिंगणघाट:- विद्यार्थ्यांच्या वाणीवर, बुद्धीवर संस्कार घडवून आणणे व त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक असे पोषक वातावरण निर्माण करून त्यांच्यावर ज्ञानरूपी अमृताचा अभिषेक करून त्यांना आदर्श नागरिक म्हणून तयार करणे हे महत्तम कार्य ज्या ठिकाणी केले जाते त्या संस्कार केंद्राला शाळा असे म्हणतात.
आपली प्राचीन भारतीय संस्कृती व त्याचे महत्त्व हे जगविख्यात आहे परंतु तरीही पाश्चात्यांच्या अनुकरणामुळे ही संस्कृती कुठे लोप पावेल का.? असे काहीसे चित्र समाजात बघायला मिळते परंतु ही संस्कृती सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मन:पटलावर बिंबविण्याचा व त्यांच्या बुद्धीला पटेल अशा स्वरूपात कोरण्याचं कार्य हिंगणघाट तालुक्यातील प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीच् अंतर्गत “भारत विद्यालय व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय”, हिंगणघाट ही शाळा सातत्याने करते आहे. ही बाब संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद,गौरवास्पद व कौतुकास्पद आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व भारत विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हा समाजात उत्तम नागरिक म्हणून ओळखला जावा हे प्रमुख ध्येय नजरेसमोर ठेवून शाळा आणि त्यातील प्रत्येक घटक हा अविरत कार्य करतो आहे. यात प्रामुख्याने संस्थेचे सन्माननीय सचिव रमेशराव धारकर आणि सन्माननीय अध्यक्ष गोकुलदासजी राठी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. केवळ पुस्तकी ज्ञान गरजेचे नसून विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमधून सुसंस्कृत करण्याचं मौलिक कार्य ही शाळा करत आहे.
शाळेची सुरुवात नित्य शालेय प्रार्थनेने होते. यात विद्येची अधिष्ठात्री माता सरस्वती हिचे “हे हंसवाहिनी ज्ञानदायी अंब विमल मती दे” या प्रार्थनेने होते याबरोबरच गायत्री मंत्राचे पठण विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या मुखातून केल्या जाते. त्यातून त्यांच्या बुद्धीवर, वाणीवर, मनावर संस्कार होतात व मन प्रसन्न, शांत, स्थिर राहण्यास मदत होते.
वसंत पंचमी हा माता सरस्वतीचा जन्मदिवस शाळेत साजरा केला जातो. माता सरस्वतीच्या उपासनेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचं कार्य उत्तम प्रकारे होते त्यातूनच विद्यार्थी दररोज वर्गा- वर्गात सरस्वती पूजन करून आपल्या शिक्षणाला प्रारंभ करतात तर सांगता “सर्वे भवन्त सुखीन”: हा शांती मंत्र म्हणून केल्या जाते.
संपूर्ण विश्वाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या सूर्याची उपासना रथसप्तमी व बालसंगम या कार्यक्रमाचे आयोजन करून केल्या जाते. यात विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, योगासने यांचे धडे देऊन रथसप्तमीला त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण केले जाते यातूनच विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक बळ प्राप्त होते. या उपासनेने शरीर आणि मन निरोगी राखण्यास मदत होते.
ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने इतिहास घडविला अशा थोर नेत्यांचे वैज्ञानिकांचे स्मरण करून त्यांच्यासारखे देशाला प्रगती पथावर विद्यार्थ्यांनकरवी नेता यावे याकरिता त्यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्याची ओळख करून दिल्या जाते यात वेशभूषा, संगीत, पोवाडा यातून विद्यार्थ्यांचे मन अधिक संस्कारक्षम केले जाते.
वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याकरिता केवळ वाचन प्रेरणा दिनानिमित्तानेच नव्हे तर दररोज प्रत्यक्ष विद्यार्थी व शिक्षक पुस्तके वाचून त्यांच्यातील ध्यानात भर घालण्याचे कार्य करतात यातून विद्यार्थ्यांना थोरामोठ्यांच्या कार्याची ओळख होते व जीवनात यशस्वी होण्याकरिता प्रेरणा मिळते. त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळते.
दरवर्षी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातून विद्यार्थ्यांना आपल्या “विविधतेत एकता” या संस्कृतीची ओळख होते. खरी कमाईचे महत्व “आनंद मेळावा” सारख्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रुचकर पदार्थांच्या मेजवानीतून शिकविल्या जाते. तसेच पाच वर्षातून एकदा सर्व शाळांचे सामूहिक स्नेहसंमेलन घेतल्या जाते. त्यातून एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती, एकोपा व सामंजस्य वाढीस लागण्यास मदत होते.
“अखंड भारत दिन” यातून राष्ट्रभक्ती विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो. “स्वामी विवेकानंद” यांचा जन्मदिन “युवा दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने रॅलीचे आयोजन करून जनमानसात थोर पुरुषांच्या कार्याचे स्मरण व त्यातून त्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी व त्यांच्या कार्यकर्तृत्वातून कार्य करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून या आणि अशासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते.
आपल्या भारतीय संस्कृतीचा ह्रास होऊ नये, ती अधिकाधिक जनमानसात वृद्धिंगत व्हावी, दृढ व्हावी, आपल्याला लाभलेली ही वैभवशाली परंपरा त्यातील विचारांचा व मूल्यांचा प्रसार व्हावा म्हणून शाळेचे योगदान सर्वाधिक असते आणि याकरिता भारत विद्यालय व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय,हिंगणघाट हे नाव संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात देखील अतिशय सन्मानाने घेतल्या जाते.
निवेदिता विनायक वझलवार.
उच्च माध्यमिक शिक्षिका
भारत उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय, हिंगणघाट

