पल्लवी मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील महादुला परिसरात पतंग पकडताना दोन भाऊ कालव्यात बुडाल्याची खळबळजनक घटना घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठ्या भावाला वाचवण्यात यश आले आहे. तर, लहान भाऊन वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. दयाशंकर अवधेश प्रजापती वय 8 वर्ष असे त्या मुलाचे नाव आहे.
बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पतंग पकडण्याच्या नादात दयाशंकर अवधेश प्रजापती हा कालव्यात पडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्र झाल्याने शोध मोहिम थांबविण्यात आला. आज, गुरुवारी पुन्हा सकाळ पासूनच त्याचा शोध घेतला जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, दयाशंकर अवधेश प्रजापती वय 8 वर्ष आणि कैलास अवधेश प्रजापती वय 12 वर्ष हे दोघे भाऊ काल दुपारी 3 वाजताच्या दरम्यान महादुला परिसरात पतंग उडवित होते. मात्र, त्यांची पतग कापली आणि ती कोराडी उर्जा प्रकल्पाजवळील कालव्यात पडली. पतंग पकडण्यासाठी दयाशंकरने पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहायला लागला. दयाशंकर पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच कैलासने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहू लागला.
हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. कैलासला वाचवण्यात त्यांना यश आले. त्यावेळी कैलासने त्याचा लहान भाऊ दयाशंकर पाण्यात वाहून गेल्याचे नागरिकांना सांगितले. यानंतर नागरिकांनी या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दयाशंकरचा शोध घेण्यासाठी पट्टीचे पोहणारे जगदीश खरे आणि अनिल यांना बोलाविण्यात आले. दोघांनी चार किलोमीटरपर्यंत दयाशंकरचा शोध घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. रात्र झाल्याने शोध मोहिम थांबवण्यात आली. आज गुरुवारी पुन्हा त्याचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दयाशंकर हा इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी होता. त्याचे वडील मडके आणि दिवे बनविण्याचे काम करतात. तर, कैलास हा इयत्ता सातवीत आहे. या घटनेने प्रजापती कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

