प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757 महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नवीन पिढीमध्ये वाचन संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी ग्रंथालय चळवळ उभी राहणे महत्वाचे आहे. यासाठी ग्रंथालयाचा विकास होणे सुध्दा तेवढेच महत्वाचे आहे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असे, प्रतिपादन खा.रामदास तडस यांनी केले.
बजाज सार्वजनिक वाचनालयात दि. 30 व 31 जानेवारी या कालावधीत दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, विदर्भ साहित्य संघ वर्धाचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, साहित्यिक प्रा.राजेंद्र मुंढे, लोक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजीव जाधव, सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रदिप बजाज, उपअभियंता महेश मोकलकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ.सुरज मडावी उपस्थित होते.
ग्रंथालयांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी ग्रंथालयाच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करणार, असे खा.रामदास तडस पुढे बोलतांना म्हणाले. ग्रामिण व शहरी भागामध्ये वाचनाची चळवळ उभी रहावी, वाचकांना वाचनासाठी ग्रंथ उपलब्ध व्हावे यासाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथालय चळवळ सामान्य लोकांपर्यंत रुजविली पाहिजे. दुर्लक्षित असलेल्या ग्रंथालयाचा विकास करणे आवश्यक आहे, असे गजानन कोटेवार म्हणाले.
आरोग्य, शिक्षण, क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी शासन प्रयत्न करीत असून वाचन संस्कृती व कला संस्कृती जपण्यासाठी सांस्कृतिक भवन जिल्ह्यात निर्माण व्हावे, अशी अपेक्षा संजय इंगळे तिगावकर यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरज मडावी यांनी केले. संचलन ज्योती भगत यांनी केले तर आभार प्रा.हर्षबोधी यांनी मानले. यावेळी ग्रंथोत्सवात लावण्यात आलेल्या ग्रंथस्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ग्रंथ दिंडीचा शुभारंभ:
सकाळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ग्रंथपुजन करुन ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. जिल्हा शासकीय ग्रंथालय ते सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप दाते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, मुरलीधर बेलखोडे, सुधीर गवळी, प्रा. हर्षबोधी यांची उपस्थिती होती.
मानवी जीवनात ग्रंथांना अनन्य साधारण महत्व आहे. वाचनाने माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून येण्यासोबतच आकलन, स्मरणशक्ती व संशोधनवृत्ती वाढते. वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सांगितले.
ग्रंथदिंडींचा शुभारंभ शासकीय ग्रंथालय येथून करण्यात आला. ग्रंथदिंडी बजाज चौक, बढे चौक, धंतोली चौक मार्गे मार्गक्रमण करून बजाज वाचनालयात समारोप करण्यात आला. यावेळी ग्रंथदिंडीमध्ये न्यू इंग्लिश हायस्कुल, केसरीम कन्या विद्यालय, रत्नीबाई हायस्कुल, मौलाना उर्दू हायस्कुल, स्वावलंबी विद्यालयाचे सुमारे 500 विध्यार्थी सहभागी झाले होते.

