अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले १११०कोटी रुपये, महागाई आणि घरभाडे भत्ता तसेच सातवा वेतन आयोग एसटी कामगारांना तातडीने लागू करावा याबाबत वेळोवेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र अद्याप शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहे. संघटनेकडून अनेकदा याबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. मात्र सरकार कडून केवळ आश्वासन मिळाले, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. अनेक वर्षांपासून नुसती निराशाच पदरी पडत असल्याने एसटी कर्मचाऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटना वर्धा विभागीय सचिव श्री. शम्मी पठाण यांनी सांगितले.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांची अनेकदा संघटनेच्या वरिष्ठ मंडळींनी भेट घेतली. कामगारांच्या आर्थिक आणि इतर प्रश्नावर वेळोवेळी चर्चा केली. ११सप्टेंबर २०२३ ला उपोषणाची हाक दिली होती. आंदोलनामुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. हे लक्षात घेऊन त्यावेळी मुख्यमंत्री यांच्या निर्देशावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महागाई भत्ता हा ३४ टक्क्यावरून वाढवून ४२ टक्के मंजूर केला होता. व इतर मागण्याकरिता पंधरा दिवसात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संघटने समवेत बैठक घेऊन निर्णय जाहीर करू असे आश्वासन दिले होते.
मात्र तीन चार महिने उलटून सुद्धा याबाबत शासन स्तरावर कुठल्याही प्रकारची बैठक आयोजित केली नाही. त्या मुळे कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झालेला असून महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आज पासून विभागीय कार्यालय वर्धा येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचे विभागाचे सचिव शम्मी पठाण यांनी सांगितले. जर प्रशासन आणि राज्य सरकारने याची दोन दिवसात दखल घेतली नाही तर संपूर्ण राज्यभर आगार पातळीवर उपोषण केले जाईल असे सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

