प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.17:- छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे नगरपरिषद हिंगणघाट यांच्या संकल्पनेतून स्मार्ट कॅफे टाॅयलेटचे तथा महिला बचत गटाव्दारा संचालित उपजिविका केंद्रांचे लोकार्पण आमदार समीर कुणावार याच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सर्वश्री किशोर दिघे, हर्षल गायकवाड मुख्याधिकारी नगरपालिका हिंगणघाट व आदी मान्यवर उपस्थित होते.
नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगरपरिषदेने राज्यात पहिल्यांदाचा ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे. केवळ 10 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतूक होत आहे. स्वच्छ आणि सुंदर शहर या संकल्पनेला अनुसरून राज्यात प्रथमच स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती नगर परिषदेद्वारा करण्यात आली आहे.
हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील निसर्गमय परिसरात अगदी 200 स्केअर फूट इतक्या कमी जागेत हे टॉयलेट स्थापित करण्यात आले आहे. यामध्ये एक कॅफे, पुरुष व महिलांकरिता प्रत्येकी 2 पाश्चात्य पद्धतीचे शौचालय, पुरुषांकरीता करिता 1 मुत्रीघर, वॉश बेसिन तसेच महिलांकरिता सेनीटरी वेंडींग मशीन या प्रकारच्या अत्याधूनिक सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समोरील दर्शनीय भागात कॅफे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागरिकांना स्वास्थवर्धक व आरोग्यदायी अंकुरित कडधान्य व ताज्या फळांचे ज्यूस उपलब्ध करून देण्यात येतील.
या स्मार्ट कॅफेचे व्यवस्थापन हिंगणघाट शहरातील बचतगटाच्या महिलांना देण्यात आले असून या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नागरिकांना टॉयलेटच्या टेरेसवर उपलब्ध असलेल्या आसनावर बसून ज्यूस पिण्याचा आनंद घेता येणार आहे. स्मार्ट कॅफे टॉयलेटच्या निर्मितीसाठी नगर परिषदेचे प्रशासक श्री किशोर दिघे, हर्षल गायकवाड मुख्याधिकारी नगरपालिका हिंगणघाट व आदी मान्यवर उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

