शिक्षणासोबतच कलागुणांना वाव आणि संधी मिळाली तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवू शकतो: डॉ. संजय दुधे
अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विद्यार्थी जीवनात शिक्षणासोबतच स्वतःच्या कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी मिळाली तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करावे आणि स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन डॉ संजय दुधे उपकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी केले. मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथील सांस्कृतिक महोत्सव उत्कर्ष उन्नतीचा, उत्सव कला संस्कृती च्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी संयोजक व संपूर्ण टीम आणि विद्यार्थिनींचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पांडुरंग तुळसकर संस्थापक अध्यक्ष विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट तर उद्घाटक म्हणून डॉ संजय दुधे उपकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, विशेष अतिथी म्हणून सतिश चाफले महामंत्री शिक्षण मंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, ॲड. इब्राहीम बक्ष अधिवक्ता हिंगणघाट, डॉ. उमेश तुळसकर सचिव विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट, डॉ. किशोरचंद्र रेवतकर प्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपुर, डॉ. नयना शिरभाते उपप्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपुर, डॉ. राजविलास कारमोरे, प्रा. मेघश्याम ढाकरे, डॉ. सपना जयस्वाल, प्राचार्य नितेश रोडे, ब्रिलीयंट स्कूल च्या मुख्याध्यापिका सविता साटोने यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आली. या प्रसंगी सतिश चाफले यांनी विद्यार्थी व समाजातील प्रत्येक युवांमध्ये सृजनाची शक्ती आहे फक्त योग्य मार्ग आणि संधी मिळाली की ती समोर येत असते हे सांगतानाच आपला शैक्षणिक, सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा टिकविणे या जबाबदारीची जाणीव सर्वांना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी ॲड. इब्राहीम बक्ष यांनी विद्यार्थी जीवनातील मजेशीर आणि प्रेरक गोष्टींचे संदर्भ देत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ उमेश तुळसकर यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांकरिता भविष्यकालीन नियोजनावर भाष्य करून विद्यार्थी हित व विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सूतोवाच केले. प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री साबळे, प्रा सुवर्णा कान्होलीकर यांनी तर आभार प्रा संगीता लांडगे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागाच्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि सर्व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

