मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला. पण, डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून तपास सुरू केला. पोलिसांना तपासादरम्यान नवऱ्यानेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली. विवाहितेच्या हत्याकांडाने परीसरात खळबळ माजली आहे.
विवाहितेच्या हत्या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली मिश्रा वय 28 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून महेश जनार्दन मिश्रा वय 34 वर्ष असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत रत्नकला शंकर तिवारी वय 72, रा. वारज, ता. दारव्हा यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्याला तक्रार दिली आहे.
मागील काही दिवसांपासून घरगुती कारणातून वाद झाल्यानंतर पतीने पत्नी दिपालीचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. त्यानंतर ही घटना कुणाला माहीत होण्याआधी त्याने इतर नातेवाईकांच्या मदतीने परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला. अंत्ययात्राची सर्व तयारी करून दिपालीची अंत्ययात्रा जामनकर नगरातून स्मशानभूमीत जाण्यासाठी निघाली. याचवेळी डायल 112 वर संशयास्पद मृत्यूची तक्रार देण्यात आली. त्यानंतर अवधूतवाडी पोलीस जामनकरनगरच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांना बाजोरिया नगरात अंत्ययात्रा दिसताच थांबवून घरी परत घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
यावेळी पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. मात्र तो हृदयविकाराच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगत होता. रात्री उशीरा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दिपालीचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. तसेच याबाबत तक्रारही दाखल झाली. दरम्यान, पोलिसांनी पती महेश यांच्या विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास अवधूतवाडी पोलिस करत आहेत.

