अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे सुरू करण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी जवळ जवळ ९८६ आवश्यक पद निर्मिती बाबत शासन आदेश दिनांक १२ मार्चला निघाला असल्याची माहिती आमदार समीर कुणावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील वर्षभरापासून हिंगणघाट येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न आंदोलनाच्या रूपाने गाजला होता. वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती बनवून राज्य शासनाला जेरीस आनण्यात आले होते. अखेर डिसेंबर २०२३ च्या नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी विधानभवनच्या पायऱ्यावर बसून धरणे आंदोलन केले होते, व राजीनामा देण्याचा इशारा ही दिला होता. आ. कुणावार यांच्या दबावाने अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासनाला हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा करावी लागली होती. लगेच काही दिवसात त्याचा शासन निर्णयही काढण्यात आला होता. व वैद्यकीय महाविद्यालयासाठी हिंगणघाट तसेच आसपास जागा शोधण्याची प्रक्रियाही जिल्हाधिकारी पातळीवर सुरू झाली.
नुकताच १२ मार्च २०२४ ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हिंगणघाट येथे सुरू करण्यात येणार्या ४३० खाटांच्या रुग्णालया करिता आवश्यक पद निर्मिती बाबत राज्य शासनाचा आदेश काढण्यात आला. या आदेशानुसार ९८६ पदे चार टप्प्यात भरण्यात येतील. यात ५२० पदे नियमित तर ४६६ पदे बाह्यस्त्रोताने भरण्यात येतील. ही ९८६ पदे चार वर्षातील चार टप्प्यात भरण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील पदे ही तत्काळ भरण्यात येतील. या संदर्भातील माहिती आमदार समीर कुणावार यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. पुढे माहिती देताना जून २०२५ पासून हिंगणघाटच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, या प्रयत्नात आपण असल्याचे व त्यानुसार पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार कुणावार यांनी सांगितले.
हिंगणघाट येथे मंजुर झालेल्या नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी सुरुवातीला ०९ कोटी रुपये मंजुर झाले होते आता पुन्हा वाढिव ०८ कोटी मंजुर झाल्याने आता एकुण १७ कोटी रुपयांचे अद्यायावत नाट्यगृह उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे बनविण्याचे योजण्यात आल्याचेही आ. कुणावार यांनी सांगीतले. यासोबत शहर हे क्रीडा नागरी म्हणून ओळखल्या जाते. पण आज पर्यंत येथे क्रीडा संकुल उपलब्ध नव्हते. ते क्रीडा संकुल लवकरच उप जिल्हा रुग्णालय जवळ उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भाजपाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे आणि पदाधिकारी उपस्थिती होते.

