मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नक्षल्यांनी टिपागड परिसरात दडवून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी कारवाई करत जप्त केल्याने नक्षलवाद्यांचा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी दिनांक 6 एप्रिल (सोमवार) सकाळी हुडकून काढली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक आटोपली. या निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु त्यावेळी ही स्फोटके पोलिसांना सापडली नाहीत. शिवाय मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे नक्षलवाद्यांना घातपात करता आला नाही. परंतु काल स्फोटके असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर सी-60 पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाचे जलद प्रतिसाद पथक तसेच बॉम्ब शोधक व नाशक विभागाचे दोन पथक टिपागड परिसरात पाठविण्यात आले. या पथकातील जवानांनी पहाडावर दडवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स हुडकून काढण्यात आले.
यावेळी पोलिसांनी शोध मोहीम राबवत घटनास्थळी स्फोटकांनी भरलेली 6 प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, स्फोटके असलेली 3 क्लेमोर माईन्स आणि 3 रिकामी क्लेमोर माईन्स आढळून आली. शिवाय गन पावडर, ब्लँकेट आणि औषधेही तेथे सापडली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. पोलिस जवळच्या पोलिस ठाण्यात सुखरुप पोहचल्यानंतर तेथे नक्षल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

