उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईच्या कामाला यंदा एप्रिलअखेर सुरवात करण्यात आली. आता पावसाळा तोंडावर आहे. मात्र, अद्यापही अनेक भागांतील नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे नालेसफाईचे हे काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्न आहे.
दर वर्षी महानगर पालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास नाले तुंबून शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, नुकसान होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जाते.
याशिवाय शहरात इतर छोटे-मोठे नाले तसेच हद्दवाढ क्षेत्रातही नाले आहेत. विशेषतः शहरातील प्रमुख नाल्यांची साफसफाई महत्त्वाची आहे. यातील काही नाल्यांची काही भागात साफसफाई झाली मात्र, काही ठिकाणी अद्यापही ‘जैसे थे’ स्थिती आहे.प्रभाग क्रमांक 2 अकोट फैल स्थित लाडिस फैल येथील नाले तुडुंब भरून वाहत असून नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर व काही नागरीकांच्या घरात शिरले होते. नागरीकांनी स्वतः च्या हाताने या नाल्याची सफाई केल्याचे चित्र आज पहावयास मिळाले.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच शहरातील ज्या भागात जास्त प्रमाणात अस्वच्छता आहे अशा भागांमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपा अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे सदस्य, अशासकीय संस्थांचे सभासद, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी, बचतगट, वस्तीस्तर संघ यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले होते. ही स्वच्छता मोहीम शहरातील काही ठिकाणी करण्यात आली. व महानगरपालिकेच्या वतीने सदर स्वच्छता अभियानाची पेपरबाजी करण्यात आली परंतु अकोला शहरात सर्वत्र हे स्वच्छता मोहीम अभियान राबविण्याची गरज आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी केली आहे

