श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- सर्वत्र शिक्षणाचे खाजगीकरण झाले, अनेक गरीब शेतकरी कामगाराची मुलाचे चांगल्या शिक्षणाचे स्वप्न भंगले. त्यात एक चिमुकली लेक इंग्लिश स्कूल मधुन घरी येते आणि बापाजवळ लाड घालत एक प्रश्न विचारते, माझी शाळा छोटी आणि दिदिची शाळा मोठी का?
शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यामुळे आज-काल अगदी खेडेगावात देखील इंग्लिश स्कूलच्या रुपात छोटे छोटे शौक्षणिक संकुल उभे राहिले आहेत. आपल्या लेकराला दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून पालक देखील पोटाला चिमटा काढुन 10-20 हजार रूपये भरून लेकरांना इंग्लिश स्कूल मध्ये पाठवत आहेत. अशाच एका इंग्लिश स्कूल मध्ये चिमुकली गार्गी शिकत होती आणि तिची आत्ये बहिण गावातील टोलेजंग इमारत आणि हजारा जवळ विद्यार्थी संख्या असलेल्या सरकारी शाळेत जायची. हि लहान मुलं सोबत खेळताना शाळेची तुलना करायचे तेव्हा “गार्गीची शाळा छोटी अन् दिदीची शाळा मोठी” असं म्हणताच गार्गीला आवडायचं नाही. मग गार्गी तीच्या वडीलांजवळ,” मला मोठ्या शाळेत जायचंय” म्हणून हट्ट करायची.
अखेर फादर्स डे च्या पुर्व संधेला इंग्लिश स्कूल सोडुन गार्गी जिल्हा परिषदेच्या मोठ्या शाळेत दाखल झाली. शाळेची इमारत शिक्षकांनी केलेलं स्वागत एवढे सगळे बाल मित्र मैत्रिणींना बघुन चिमुकल्या गार्गीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. फादर्स डे निमित्त एका बापाने लेकीला दिलेली हि अमुल्य भेट मनाला सुखद धक्का देऊन गेली.
आता हि गार्गी कोण आणि गार्गीचे वडील कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. गार्गीचे वडील म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून पिंपळनेर (ग.) येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक श्री. गोकुळ गवळी. गोकुळ आमचा वर्ग मित्र. माध्यमिक शिक्षण घेतानाच गोकुळ वडिलांनी सुरू केलेल्या छोट्याशा हॉटेलमध्ये लक्ष घालायला लागला. व्यवसायाचे बाळकडू गोकुळला लहानपणीच त्याच्या वडिलांकडून मिळाले आणि वडिलांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात करून एक मुलगा म्हणुन तो अगोदरच सिध्द झाला आहे, पण आज त्याने लेकीच्या हट्टा खातर ऐपत असुनही इंग्लिश स्कूलला राम राम ठोकत तीला तिच्या आवडत्या जिल्हा परिषद शाळेत दाखल करुन एक बाप म्हणुन त्याने एक वेगळीच उंची गाठली आहे.
शतकाची साक्षीदार असलेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पिंपळनेर, जिथे आमच्या कित्येक पिढ्या शिकल्या, संस्कारित झाल्या त्या सरकारी शाळेत गार्गीला चांगल्या शिक्षणाबरोबरच संस्कार आणि स्वयंशिस्तीचे धडे मिळुन एक सुजाण नागरिक गार्गीच्या रुपात घडो आणि तीने शिकुन खुप मोठे होवो याच गार्गीला शुभेच्छा. तर एकीकडे सरकारी शाळेकडे बघुन लोक नाक मुरडत असताना गोकुळने केलेल्या हिमतीस या बाप दिनी सलाम. त्याने उचललेले हे पाऊल अनेकांना मार्गदर्शक ठरो हीच अपेक्षा.

