प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 21:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने चला जाणूया नदीला हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यातील धाम नदीचा समावेश यामध्ये करण्यात आला असून धाम नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नदीच्या उमगस्थानापासून धाम नदीला मिळणारे नाले, नदीच्या पाणलोट क्षेत्रात माथा ते पायथा या तत्वावर नाला खोलीकरण व रुंदीकरण, माती नाला बांध, सलग खोल समपातळी चर आदी जल व मृदसंधारणाची कामे करण्यात येत आहे. यामुळे धाम नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे चला जाणूया नदीला अभियानांतर्गत धाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी विविध कामांचे नियोजन करण्यात आले असून उपवनसंरक्षक राकेश सेपट, धाम नदीसाठी नेमन्यात आलेले नदी प्रहरी मुरलीधार बेलखोडे, माधव कोटस्थाने, सुनिल रहाणे व भरत महोदय यांनी वेळोवेळी भेटी दिल्या असून कामांची पाहणी केली.
आर्वी व कारंजा वन परिक्षेत्रामध्ये धाम नदीच्या पाणलोट क्षेत्रात जास्तीत जास्त पाणी जमीनीत मुरावे यासाठी नाला खोलीकरण तसेच नाल्यावर दगडी बंधारे, जाळीचे गॅबीयन बंधारे बांधण्यात येत आहे. वनक्षेत्रातील पावसाचे पाणी साठवण होऊन उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी, यादृष्टीने पाणी साठवण तलाव, गवताळ कुरण देखील तयार करण्यात आले आहे.
चला जाणूया नदीला अभियानांतर्गत धाम नदीचे उगमस्थान कारंजा तालुक्यातील धामकुंड पासून ते सुजातपूर येथील वेणा नदीच्या संगमापर्यंत एकूण 86 किमी लांबीच्या नदी काठच्या गावांमधील नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी संवाद व अभ्यास यात्रा, गावफेरी, शिवार फेरी आदींचे आयोजन करण्यात आले होते. नदीपात्रात सोडण्यात येणारे सांडपाण्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. पुररेषा आखणी, नदीपात्रातील अतिक्रमण, पाणलोट क्षेत्रातील पीक पध्दती आदींचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यात येणार आहे.

