अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात शासकीय जागा असतानाही शहरात होणारे प्रास्तावित शासकिय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथील उद्योजकांचे खाजगी जमिनीवर उभारण्याची आमदार समीर कुणावार यांचा आग्रह का? असा सवाल मेडिकल कॉलेज संघर्ष समीतीत द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.
स्थानिक हरी ओम मंगल कार्यालय येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सचिव सुरेंद्र टेंभुर्णे, सौ रागिनी शेंडे, सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी ढाकणे, सुजाता जांभूळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या काही उद्योजक मित्रांच्या वैयक्तिक फायद्यासाठी आमदार समीर कुणावार हे वेळा येथील खाजगी जमीनीवर नियोजित महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला. हिंगणघाट येथील उपजिल्हा परिसरातील शासकीय जागेवर हे नवीन महाविद्यालय न उभारल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा समितीच्या वतीने तसेच हिंगणघाटच्या जनतेच्या सहभागाने करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
वेळा हे ठिकाण हिंगणघाट शहरापासून १४ किलोमीटर आहे. असे शासकीय दस्तऐवज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत वेळा हे १२ किलोमीटर अंतरावर असल्याचे विधान केल्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी पाटील यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा आरोप लावला होता. यासंबंधी दस्ताऐवज माजी आमदार राजू तिमांडे यांनी पत्रकारांना दिले.
परिसरात रिकाम्या असलेल्या शासकीय जमिनी विषयी नकाशे व दस्ताऐवज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने पत्रकारांना दाखविण्यात आले. येथे जवळपास ४० एकर पेक्षा जास्त शासकीय जमीन उपलब्ध असल्याचे पटवून देण्यात आले. यावेळी सर्व पत्रकारांना उपजिल्हा रुग्णालय परिसरात शासकीय जागा उपलब्ध असल्याची शहानिशा करण्याकरिता प्रत्यक्ष हजर होण्याचे आवाहन सुद्धा पत्रकारांना करण्यात आले.
मल कन्स्ट्रक्शन ची खाजगी जमीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देताना अनेक संशयास्पद बाबी समोर आले आहेत, या जमिनीची मल कन्स्ट्रक्शन यांच्या नावे विक्री होण्यापूर्वीच शासनाला वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा देण्याचां प्रस्तावसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.
वेळा येथील खाजगी जमीन शासनाला हस्तांतरित करून मलिदा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे यांनी केला. त्यांनी हिंगणघाट शहरातच उपलब्ध असलेल्या शासकीय भूखंडावरती प्रास्तावित वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात यावे, जेणेकरून याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल असे विचार व्यक्त केले.
विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मागणी केल्याप्रमाणे मल कन्स्ट्रक्शन च्या झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी यावेळी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. या पत्र परिषदेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सचिव सुरेंद्र टेंभुर्णे, सुरेंद्र बोरकर, पदाधिकारी रागिनी शेंडे, गीता मेश्राम, शितल तिवारी इत्यादी महिलांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

