आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यातील जेष्ठ नागरिकांचे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, सोबत कोणी नसल्याने किंवा पुरेशी माहिती नसल्याने अनेक जेष्ठ नागरिकांचे भारतात किंवा महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र जाण्याचे स्वप्न पुर्ण होत नाही. अशा सर्व सामान्यजेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनशांती तसेव आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्य शासनाने 60 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक जेष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी जेष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षावरील असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी लाभार्थ्यांचे 15 वर्षापुर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुंटूंब प्रमुखाचा 2 लाख 50 हजार रुपयाच्या आत असलेला उत्पन्न दाखला किंवा पिवळे, केशरी रेशन कार्ड अनिवार्य आहे. सोबतच वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक असणार आहे.
लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीव्दारे शासन निर्णयातील अटी व शतीच्या अधिन राहून करण्यात येईल, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

