✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
पंचवटी जि. नाशिक:- आज सोशल माध्यमामुळे जग खूप जवळ आले आहे. एखादी घटना घडता क्षणीच या माध्यमातून आपल्याला समजते. पण काही लोकं खोट्या अफवा पसरवून समाजात विष पसरविण्याचे काम करत असल्याचे पण पुढे आले आहे.
वर्षभरापूर्वी पालघर आणि गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यात अविचाराने पसरवलेल्या अफवांमुळे संतापजनक घटना घडून अनर्थ झाला आहे. त्याची पुनरावृत्ती शहरांतही घडू नये म्हणून शहर पोलिस सतर्क झाले असून निराधार अफवा पसरू नयेत. अन्यथा संबंधितावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पंचवटी परिसरातील कोणार्कनगर भागातील ६ लहान मुलांचे अपहरण झाले असून आपल्या मुलांना एकटे घराबाहेर सोडू नका असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसाच एक मेसेज वडाळा परिसराचा उल्लेख करून व्हायरल केला जात असल्याने शहरात भीतियुक्त खळबळ उडाली आहे.
वास्तवतेचा विपर्यास करणाऱ्या अशा मेसेजमधून समाजात पसरणारी भीती प्रसंगी कुठलेही बेकायदेशीर कृत्य करण्यास धजावते त्यातून मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडू शकतात. यामुळे नाशिक शहर पोलिस सतर्क झाले असून, अफवा पसरविणाऱ्या घटकावर नजर ठेवून आहेत.
विविध व्हॉट्स ॲप ग्रुप, फेसबुकवर मुलांच्या अपहरणाच्या फिरत असलेल्या मेसेजबाबत आडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असा कोणताही प्रकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला नसून कोणत्याही प्रकारचा गुन्हा आतापर्यंत दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
“कृपया मेसेज फॉरवर्ड करताना सत्यता तपासून घ्यावी. अपहरणाची कोणतीही घटना कोणार्क नगरसह पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली नसून तशा स्वरूपाचा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.” – इरफान शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक.

