श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभेच्या संदर्भाने मोठी बातमी हाती येत आहे. बीड विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बीड विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी अर्ज भरले होते. मात्र आता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काहीवेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज माघारी घेत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या समीकरणांमध्ये मोठे बदल होतील.
चौसाळा मतदार संघातून दोनदा तर बीड मतदार संघातून दोनदा असे चार वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांची राज्याच्या कॅबीनेट मंत्री पदापर्यंत राजकीय कारकिर्द राहिली. एकेकाळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख ओबीसी नेत्यांमधील एक होते. बंडखोरी केलेले पुतणे संदीप क्षीरसागर यांना पक्ष ताकद देत असल्याने त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला.
मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुतणे संदीप क्षीरसागरांनी पराभव केला. मागच्या वर्षी त्यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही त्यांची साथ सोडून धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले.
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेने माजी मंत्री क्षीरसागरांना पक्षातून काढून टाकले. त्यामुळे या निवडणुकीत ते अपक्ष रिंगणात उतरले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संदीप क्षीरसागर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. योगेश क्षीरसागर मैदानात आल्याने काका-पुतणे रिंगणात होते.

