राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणूकिसाठी मतदानाला पडायला अवघे काहीच तास शिल्लक असताना विरार मध्ये खळबळ उडवून देणारा राजकीय राडा बघायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे हॉटेल विवांतमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती समजल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर धडक दिली. यावेळी भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. याच हॉटेलच्या एका रुममध्ये 7 महिला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधाण आले आहे.
विरारमधील हॉटेल विवांतमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच वेळी बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना घेराव घातला आणि जाब विचारण्यास सुरुवात झाली.
विरारमधील हॉटेल विवांतमध्ये बविआचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्ते, पोलिसांसह हॉटेलच्या काही रुमची झडती घेतली. त्याच वेळी 7 महिला आढळून आल्याने खळबळ उडाली. या महिलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण सगळे एका ग्रुपने आलो असल्याचे सांगितले. आपण एका व्यक्तीसोबत आलो असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या सगळ्या महिला विविध वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हितेंद्र ठाकूर यांनी काय म्हटले?
बविआचे प्रमुख, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, विनोद तावडे हे आज पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. ही माहिती मला भाजप नेत्याने दिली होती. त्यानंतर आम्ही आज त्या ठिकाणी दाखल झालो, असे ठाकूर यांनी सांगितले.
नेमकं काय झालं?
विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते. याबातची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह विवांत हॉटेल गाठले. यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवले.

