युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बदल विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विधान केल्याने विरोधक अजून आक्रमक झाले आहे. त्यात राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अनिल देशमुख यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करीत कर्जमाफीचे आश्वासन हा फक्त चुनावी जुमला होता, असे म्हटले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन निवडणुकीत महायुतीने दिले. सरकार आल्यानंतर मात्र सत्ताधाऱ्याना या आश्वासनाचा विसर पडलेला दिसत आहे. अजित पवार यांनी मी माझ्या भाषणात कधीच कर्जमाफीचा उल्लेख केला नाही, असे वक्तव्य केले. यावरून सरकारची खरी नियत लक्षात येते, असा आरोपही त्यांनी केला.
महायुतीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असा जाहीरनाम्यात भाजपने स्पष्टपणे उल्लेख केला होता. आता सरकार म्हणून अजित पवार यांचीसुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्या बळीराजाला कर्जमुक्त करुन आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे. नुकतेच मी कर्जमाफीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
महायुतीतील भाजपमधील अनेक नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा विषय ऐकला का? ….अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात, असे म्हणत हातवर केले आहेत.
दरम्यान, सरकार सत्तेवर येऊन जवळपास दोन महिने होत आहेत. मात्र शेतकरी कर्जमाफीवर सरकारने चकार शब्द देखील काढलेला नाही. यावरून विरोधकांनी सरकारला आता घेरण्यास सुरुवात केली आहे.

