मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*जिमलगट्टा:* दि जोश फाउंडेशन व ग्रामपंचायत जिमलगट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने दि जोश फाउंडेशनच्या जोश चॅरिटेबल हॉस्पिटल, जिमलगट्टा येथे दुसरे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात १२४ रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सल्ला, औषधोपचार आणि निदान सेवा पुरवण्यात आले. हा उपक्रम दि जोश फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. संगीता मेडी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संघाच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.
या शिबिरात डॉ. संगीता मेडी, डॉ. शिरीष रंगूवार, डॉ. मोनाली मेश्राम, डॉ. वैभव वाकडे आणि डॉ. सुधीर मुदमडिगेला या वैद्यकीय तज्ज्ञांनी सहभाग घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. डॉ. संगीता मेडी यांनी सांगितले की, “आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आम्ही या समुदायांच्या आरोग्याच्या दृष्टीने निरंतर काम करत आहोत.”
डॉ. मोनाली मेश्राम, डॉ. शिरीष रंगूवार, डॉ. वैभव वाकडे आणि डॉ. सुधीर मुदमडिगेला यांनी रुग्णांना आरोग्याच्या समस्यांवर मार्गदर्शन केले. त्यांनी आदिवासी समुदायातील आरोग्याविषयीची अज्ञानता, त्यांच्यात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा आणि योग्य वैद्यकीय माहितीचा अभाव या विषयांवर विस्तृत माहिती दिली. त्यांनी रुग्णांना समजावून सांगितले की, आरोग्याच्या समस्यांवर लवकर लक्ष दिल्यास त्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात आणि त्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मधुकर कांबळे, श्रीनिवास कुमारे, प्रतिभा कुमारे, पंचफुल्ला कुमारे या संघ सदस्यांचा मोलाची भूमिका होती. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शिबिर सहजतेने आणि सुव्यवस्थित पार पडले.
दि जोश फाउंडेशनने जिमलगट्टा ग्रामपंचायत, जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आशा कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांच्या अमूल्य सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. या शिबिरात येदरंगा, येदनपल्ली, रासपल्लो, कोंजेड, पाट्टीगाव, किश्तापूर, लोहा, कल्लेड, देचलीपेठा, जिमलगट्टा, गुंदेरा, उम्मानूर, गोविंदगाव, सिंदा या गावांतील रुग्णांनी सहभाग घेतला आणि या वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध झाल्या आहेत. दि जोश फाउंडेशनच्या अशा उपक्रमांमुळे समाजातील दुर्बल घटकांना नवी दिशा मिळत आहे.

