मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.८फेब्रु:- स्थानिक सुभाष व्यायाम प्रसारक मंडळाचे वतीने आयोजित “आमदार चषक २०२५” विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे काल दि.७ रोजी मोठ्या थाटात उद्घाटन झाले. सदर स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार तसेच जगप्रसिद्ध डब्ल्यू डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियन द ग्रेट खली उर्फ दिलीपसिंग राणा यांचे शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी माजी खासदार तथा भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, हिंगणघाट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, पोलिस ठाणेदार मनोज गभणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे, स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष रितेश गावंडे, सचिव धनंजय बकाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक मोहता हायस्कूलच्या प्रांगणावर आयोजित या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी ढोल पथकाच्या व फटाक्याच्या आतिषबाजीत ग्रेट खली यांनी मैदानाचे भूमिपूजन केले. ग्रेट खली यांनी याप्रसंगी खेळाडुंना मार्गदर्शन पर संबोधित करताना येथील आमदार समीर कुणावार यांचे विशेष आग्रहावरून हिंगणघाट येथे भेट दिली असल्याचे सांगितले.
हिंगणघाट शहर हे एकेकाळी कब्बडी माहेरघर असून येथील क्रीडा शौकिनांचा प्रतिसाद पाहून दि ग्रेट खली यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत या क्रिडा शौकिनांचे नगरीस पुन्हा भेट देण्याचे मान्य केले.
उदघाट्न सोहळ्यानंतर लगेच बीसीसी क्रीडा मंडळ हिंगणघाट व शिवछत्रपती क्रीडा मंडळ यांच्यात प्रेक्षनीय सामना पार पडला. यावेळी सुभाष व्यायाम प्रसारक मंडळाचे पदाधिकारी तसेच क्रीडा क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, अनेक नामवंत माजी खेळाडू, क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत विदर्भातील अनेक नामवंत कबड्डी चमूंनी हजेरी लावली असून उद्या दि.९ रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
ग्रेट खली यांची आ. कुणावार यांचे निवासस्थानी भेट: कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने हिंगणघाट शहरास भेट देणारे दि ग्रेट खली या जगप्रसिद्ध मल्लाने विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे निवासस्थानी ही भेट दिली. याप्रसंगी खली यांचे भाजपा कार्यकर्ते तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी खली यांना शुभेच्छा देऊन स्वागत केले. आ. कुणावार यांनी त्यांचे आग्रहाखातर कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भेट दिल्याने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

