अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर-१२ फेब्रुवारी:- सावनेर परिसरातील पटकाखेडी, कोठोडी, आदासा व येरणगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वेस्टर्न कोल्ड फिल्डने ओपन कास्ट खदान सुरू करण्यासाठी २०२१ मध्ये अधिग्रहित केल्या. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असतांना अद्यापही त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित केली नाही. पीडित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
वेकोलि कायद्याला न जुमानता मनमानी करीत आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वेकोलीच्या अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेणार नाही. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या रास्त असल्याने विकोलीने त्या त्वरित मार्गी लावाव्यात, अन्यथा स्वतः आंदोलनात उतरून आंदोलन तीव्र करून येथील सर्व खदानी बंद पाडू, असा इशारा आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी आंदोलनस्थळी संबोधित करताना वेकोलीच्या सीएमडीला दिला आहे.
सोमवारी दि.१० फेब्रुवारीला आंदोलनस्थळी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आदर्श कोळसा माईन येथील कोळश्याने भरून निघणारे ट्रक रोखून धरले. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था बंद पडली होती. गावांचे लवकर पुनर्वसन करण्यात यावे, चुकीच्या पद्धतीने झालेली मोजणी पुन्हा करावी, प्रत्येक घरमालकाला योग्य मोबदला मिळावा, शेतकऱ्याला न्यायालयाने दिलेल्या धोरणानुसार तीन महिन्याच्या आत नोकरी द्यावी, पुनर्वसन होईस्तोवर पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे,आंगेवाडा येथील ३० हेक्टर बाधीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या महत्त्वाच्या सहा मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत.
आमदार डॉ आशिष देशमुख यावेळी म्हणाले, “मागच्या सहा महिन्यापूर्वीदेखील अशा प्रकारचे आंदोलन इथल्या कास्तकारांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कोळसामंत्री किशन रेड्डी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठका घेतल्या. डब्लूसीएलच्या कार्यालयात गेले. मी आमदार झाल्यानंतर डब्ल्यूसीएलचे सीएमडी यांच्यासोबत आपण या संदर्भात २-३ वेळा भेटलो आणि मीटिंग घेतली. आपल्याला कुठेतरी कमी लेखण्याचं कार्य आणि ही अशी वागणूक डब्लूसीएलच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. आपल्या सर्वांच्या तोंडाला पान पुसण्याचा काम डब्लूसीएलच्या सीएमडी यांनी केले आहे. आपली वडीलोपार्जित जमीन ज्याच्यावर पिढ्यानपिढ्या आपण उपजीविका करत आहोत, ती आपण डब्ल्यूसीएलसाठी दिली. या जमिनीखाली कोळसा आहे, कोळशाच्या माध्यमातून वीज निर्मिती होते. आपण मोठ्या मनाने आपली जमीन डब्ल्यूसीएल ला दिली. भूमी अधिग्रहणाचा कायदा धाब्यावर बसवून, वेगवेगळे तर्क काढून डब्लूसीएल या शेतकऱ्यांना त्रास देत आहे. या जमिनीच्या वारसाला नोकरी पासून दूर ठेवण्याचं कटकारस्थान डब्ल्यूसीएल करत आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आम्ही या आंदोलनात सहभागी आहोत. जोपर्यंत आपल्या या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरूच राहील. घरांना योग्य मोबदला, पिण्याच्या पाण्याची सोय, नवीन घरात पुनर्वसनाची सोय करावीच लागेल. पुनर्वसनाची प्रक्रिया प्रलंबित होत आहे साधी जागा देखील डब्लूसीएल फायनल करू शकले नाहीत. हे आंदोलन अधिक तीव्र करू आणि येणाऱ्या २० तारखेला सावनेर, कळमेश्वर तालुक्यातील आंदोलक डब्लूसीएलच्या सीएमडी यांच्या कार्यालयावर धडकू. २० तारखेला नागपूर शहराला दणाणून सोडण्याचे काम करू. आपण सर्व परत संध्याकाळी या स्थळी येऊ आणि आपले आंदोलन सुरूच ठेवू. २१ तारखेला चंद्रशेखर बावनकुळे हे या आंदोलनाला भेट देऊन आपल्यासोबत असल्याची ग्वाही देतील.
चार महिन्यापूर्वी दिलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिशानिर्देशाचे पालन करण्यात येत नाही. २१ फेब्रुवारी नंतर कोळशाच्या वाहतुकी साठी असलेली रेल्वे बंद पाडण्यासाठी सुद्धा आम्ही मागेपुढे पाहणार नाही. सावनेर, कळमेश्वर क्षेत्रातील डब्लूसीएलच्या कोळशाच्या जेवढ्या खाणी आहेत त्या बंद केल्याशिवाय थांबणार नाही, ही आंदोलनाची दिशा मी आजच स्पष्ट करत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कोणाची हरकत नसेल तर मी स्वतः करेन. २० फेब्रुवारीनंतर मी स्वतः इथे आंदोलनकर्त्यां बरोबर दिवस-रात्र थांबेल. न्याय हक्क मागण्या मान्य केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, आंदोलकांसोबत उभा आहे. नवीन घर, मुलांना रोजगार, पिण्याच्या पाण्याची सोय डब्लूसीएल कडून झालीच पाहिजे. स्वतःच्या पोरांना नोकरी देण्याचं काम डब्लूसीएलच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. आपल्या मागण्या पूर्ण होईस्तोवर हे आंदोलन सुरूच राहील. २० फेब्रुवारीपर्यंत डब्लूसीएलने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.” यावेळी भाजपाचे अनेक नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते उपस्थित होते.

