पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका पतीने झोपेत असलेल्या आपल्या पत्नीवर चाकूने वार करीत, तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे. रवी नांदुरकर वय 36 वर्ष, रा. जुना बगडगंज असे आरोपी पतीचे नाव असून पिंकी नांदुरकर वय 32 वर्ष असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी दि.17 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.00 वाजताच्या दरम्यान जुना बगडगंज येथे घडली आहे.
आदल्या दिवशी पत्नीच्या कुटुंबाबरोबर एन्जॉय: या घटनेच्या आदल्या दिवशी आरोपी रवीच्या घरी पत्नीची नातलग बहिण, मोठी आई आणि इतर नातेवाईक आले होते. त्यामुळे घरात चायनिज पदार्थ तयार करण्यात आले होते. पत्नीच्या कुटुंबा बरोबर रवीने सर्व पदार्थ खाऊन त्यांच्या बरोबर एन्जॉय केला. मात्र, त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याने हे धक्कादायक कृत्य केले.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी रवी हा गाड्यांचे सीटकव्हर शिवून देण्याचे काम करीत होता. याशिवाय पत्नी पिंकी ही तांडापेठ परिसरात एका फर्ममध्ये नोकरी करते. त्यांना पियुष वय 12 वर्ष आणि यश वय 14 वर्ष अशी दोन मुले आहेत. रवी हा पिंकीला दररोज तिच्या कामाच्या ठिकाणी सोडून यायचा आणि कामाची सुट्टी झाल्यानंतर तिला घ्यायला जायचा. सोडून दिल्यावर तो आपल्या टेलिफोन एक्सचेंज चौकातील दुकानात काम करायचा.
एक महिन्यापूर्वी रवीने भाड्याचे घर बदलवून जुना बगडगंज येथील मेंडुले यांच्या घरी भाड्याने राहण्यास सुरुवात केली होती. दोन दिवसांपूर्वी त्याच्या डोक्यात पत्नीचे कुठेतरी अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय आला. त्यातून त्याने पहाटे चार वाजताच्या सुमारास उठून पत्नीच्या गळा आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. ती जखमी झाली. मुले यावेळी तिथेच असल्याने त्यांनी आरडाओरडा केला.
दरम्यान आवाजाने घरमालक आणि इतर काहीजण धावून आले. त्यांनी त्याला पकडून ठेवत पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पिंकी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर उपचार करीत आहेत.
पोलिसांनी रवीला ताब्यात घेतल्यावर त्याची चौकशी केली. यावेळी त्याने पत्नीसह दोन्ही मुले आणि स्वतः असे संपूर्ण कुटुंबालाच संपवायचे होते अशी माहिती दिली. त्याचा विचार दोन दिवसांपासून त्याच्या डोक्यात सुरू होता. यासाठी त्याने चाकुही खरेदी करून लपवून ठेवला होता. मात्र, पत्नीला चाकू मारल्यावर ती किंचाळली. त्यामुळे दोन्ही मुले उठली आणि त्यांना वडिलांच्या हातात चाकू बघून आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रवी भानावर आला आणि त्याने मुलांना मारण्याचा विचार सोडल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान पोलिसांनी रवीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

