अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट द्वारा संचालित तुळसकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे १० मार्चला महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करून भारतातील महिला शिक्षणाच्या प्रणेत्या “सावित्रीबाई फुले” यांना त्यांच्या स्मृती दिनी आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व वक्त्या म्हणून डॉ. रेखा नानोटकर, कम्युनिकेशन लीडर, लीन इम्प्लीमेंटर हिंगणघाट या होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय पाहुणे व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे यांनी प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाची रूपरेषा, महिलांचा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रातील सहभाग यावर प्रकाश टाकला.
यावेळी डॉ. रेखा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक तसेच मानसिक आरोग्य कसे सुधारायचे तसेच स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःची प्रतिमा कशी सुधारायची याबद्दल मार्गदर्शन केले. सोबतच मनातून वाईट आठवणींचा राग कसा सोडायचा, आकर्षणाच्या वैश्विक नियमा वर त्यांनी भाष्य केले. विद्यार्थी दशेत गाढ झोपेचे महत्त्व सांगून मनातील विषारीपणा कसा दूर करायचा याबद्दल प्रबोधन केले. मार्गदर्शनानंतर दैनंदिन जीवनात लोकांना भेडसावणाऱ्या विविध मानसिक आव्हानांबद्दल विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी खुले सत्र आयोजित करण्यात आले आहे. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजू तन्ना तर आभार प्रदर्शन प्रा. शीतल पाटील यांनी केले. यावेळी पदविका विभागप्रमुख प्रा. प्रदीप रघाटाटे, प्रा. राकेश जोशी, प्रा.प्रणय बुर्ले, सोनल इटनकर, मोनिका भोयर आणि पराग भाईमारे यांच्या प्रयत्नांमुळे प्राचार्यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम यशस्वी झाला.

