शेतकऱ्यांच्या न्यायासाठी माजी आ. सुभाष धोटेंची वनाधिकाऱ्यांशी सकारात्मकत चर्चा.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या मौजा हिरापूर खडकी या गावातील शेतकऱ्यांना तेलंगणाच्या वनाधिकाऱ्याकडून शेतात पेरणी न करण्याची व शेतात झाडे न लावण्याची धमकी दिली असून तसे केल्यास अटक करण्याची सुद्धा धमकी दिली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
हिरापूर खडकी हे गाव तेलंगणाच्या सीमेवर असून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील या गावाची परिस्थिती सुध्दा १४ गावांसारखीच आहे. या गावातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून पट्टे मिळाले असून सुद्धा तेलंगणातील वन अधिकारी ही जमीन आमची आहे व या ठिकाणी आम्ही प्लांटेशन करणार आहोत. तुम्ही ही जागा सोडून द्या अशा सूचना करीत सुटले आहेत.
त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली. त्यांच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडले. गोरगरीब आदिवासी शेतकरी बांधवांवर होत असलेल्या या अन्याची गंभीर दखल घेत माजी आमदार सुभाष धोटे यांनी लगेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील वन विभागाचे अधिकारी, तसेच विरूर वनपरिक्षेत्र अधिकारी महेश दिघे यांच्याशी संपर्क साधून स्थानिक शेतकऱ्यांच्या अतिशय संवेदनशील बाबीची तातडीने दखल घेऊन, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व शेतकऱ्यांची समस्या दूर करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी तिरुपती पोले, ग्रामपंचायत सरपंच सिताराम मडावी, गाव पाटील जंगू सोयाम, शिवाजी पोले, शेषराव सुरनर, केशव सुरनर, शिवाजी देवकते, नामदेव सुरनर, गणेश पोले, विठ्ठल बिडकर यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

