रोजगार द्या, अन्यथा गादी सोडा अशा घोषणांनी परिसर दणाणला : पात्रतेनुसार नोकरी न मिळाल्याने सुशिक्षित युवक हताश.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसी “राष्ट्रीय बेरोजगार दिवस” म्हणून नोंद घेत चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे बल्लारपूर येथे भजे तळा आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात बल्लारपूर विधानसभेतील युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुशिक्षित असूनही रोजगार न मिळाल्याने हताश झालेल्या युवकांनी शासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी केली. “रोजगार द्या, अन्यथा गादी सोडा”, “बेरोजगारी हटवा – युवा वाचवा” अशा घोषणा देत बेरोजगारीच्या तीव्र समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
अलिकडील अहवालानुसार देशातील व महाराष्ट्रातील सरासरी बेरोजगारीचा दर अनुक्रमे सुमारे ७% व ८ % पर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण शहरांकडे रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत, मात्र तेथेही स्थिर नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. लाखो युवक उच्चशिक्षित असूनदेखील भरती प्रक्रियेतील विलंबामुळे रोजगाराविना घरी बसले आहेत. शेतीतील अस्थिर उत्पन्न, उद्योग-धंद्यांची मरगळ, व अपुऱ्या रोजगार निर्मितीमुळे असंख्य तरुणांमध्ये असंतोष आहे.
या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट संदेश दिला की, “बेरोजगार तरुणांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष अखंड सुरू राहील.” शासनाने तात्काळ रोजगारनिर्मितीचे ठोस पावले उचलावीत, अन्यथा युवकांच्या रागाची झळ सरकारला भोगावी लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष पापा आर्या, माजी नगरसेवक माकोडे, काँग्रेस कमिटीचे इस्माईल दाखवला, युवक शहराध्यक्ष नरेश आनंद, प्रणय लांडे, गुरनुले यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो बेरोजगार तरुण उपस्थित होते.

