🖊️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक : यंदा झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असली तरी संततधार पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे. परिणामी, दसर्याला झेंडूच्या फुलांचे भाव वधारले आहेत. किरकोळ बाजारात झेंडू २०० रुपये किलो व दीडशे रुपये शेकड्याने झेंडूची विक्री केली जात आहे.
दसर्यानिमित्त फुलांचा आरास सजावटीसाठी, घरातील देवदेवतांसह शस्त्रपूजन व वाहने आणि गृहसजावटी साठी फुलांचा वापर केला जातो. यंदाही हे चित्र कायम असून, फुलबाजार गर्दीने फुलून गेला आहे. यात सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना मागणी आहे. शहरातील रस्त्यावर सध्या पिवळ्या आणि केशरी झेंडूच्या राशी पडल्या आहेत. फुलांच्या सुगंधामुळे बाजारात उत्साह व चैतन्याचे वातावरण आहे. नाशिक शहरात मखमलाबाद, आडगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडीसह दिंडोरी व सिन्नर फुलांची आवक होत आहे.
फुलांच्या विक्रीतून शेतकर्यांना रोख पैसे मिळत असल्याने दसर्यामध्ये त्यांना आर्थिक आधार मिळतो. त्यामुळे हक्काचे पीक म्हणून शेतकरी झेंडूची लागवड आवर्जून करतात. परंतु, यंदा पावसाने फुलांच्या शेतीचे नुकसान झाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. दिंडोरी तालुक्यात हवामान झेंडूच्या उत्पादनास चांगले असल्यामुळे यंदा तालुक्याच्या विविध भागांत झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र, गेला सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे झेंडूची फुले खराब झाली. शेतात पाणी साचल्याने रोपांची मुळे सडली असून, ऊन नसल्याने झाडांची निरोगी वाढ झाली नाही. काही भागांत झेंडूची रोपे जळाली आहेत. परिणामी, यंदा फुलांचे भाव वधारले असून, झेंडूची फुले दिडशे रुपये शेकडा व किरकोळ बाजारात ५०० रुपये जाळीने विकले जात आहेत, असे फुल विक्रेत्यांनी सांगितले.