मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी :-अत्यंत हलाखीच्या
परिस्थितीतून शिक्षण घेत, जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर राज्यात प्रथम क्रमांकाने सहायक आयुक्त समाजकल्याण गट अ पदावर भटक्या जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या रविंद्र सत्यम भंडारवार यांनी आपली कर्तृत्वकहाणी घडवली आहे. सध्या ते बल्लारपूर नगर परिषद येथे उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.रविंद्र भंडारवार यांचे मूळ गाव राजाराम जवळील रायगट्टा तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगट्टा येथे, तर माध्यमिक शिक्षण भगवंतराव आश्रम शाळा राजाराम व राजे धर्मराव हायस्कूल महागाव येथे झाले.
पुढे विज्ञान शाखेत त्यांनी राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरीतून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डी. एड, बी.एड आणि एल. एल. बी. अशी व्यावसायिक पदवी त्यांनी प्राप्त केली.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), नवी दिल्ली येथून बी. ए., एम. ए. (इतिहास), एम.एस्सी. (रसायनशास्त्र) आणि एम.एस.डब्ल्यू. (समाजकार्य) अशी अनेक पदव्या मिळवल्या. तसेच इतिहास व समाजकार्य या दोन विषयांमध्ये सेट परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे.
त्यांचा कारकिर्दीचा प्रवास प्रेरणादायी आहे. रविंद्र भंडारवार यांनी २०१० मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात करून विद्यादान करत सतत अभ्यासाची छंद सुरु होती. त्यानंतर २०१५ मध्ये पोलिस उपनिरीक्षक (PSI), २०१७ मध्ये मंत्रालय सहाय्यक व अन्नपुरवठा निरीक्षक अशी पदे भूषविली.
२०१९ मध्ये राज्य संवर्ग सेवेत उपमुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली येते कार्यरत होते. त्यानंतर बदली बल्लारपूर नगर परिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्यात प्रथम क्रमांकाने सहायक आयुक्त समाजकल्याण गट अ पदासाठी पात्रता मिळवली आहे.
त्यांना कुटुंबाचे योगदान आणि प्रेरणा मिळाली असून त्यांचे वडील शेतकरी तर आई गृहिणी आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही पालकांनी त्यांना शिक्षण देत उभे केले. आपल्या यशाचे श्रेय रविंद्र भंडारवार यांनी आई, वडील, भाऊ, बहीण, भाऊजी, पत्नी, मुले, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांना दिले आहे.
जिद्द, चिकाटी आणि समाजसेवेची ओढ असून –
नक्षलग्रस्त व दुर्गम भागातून आलेल्या भंडारवार यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव असून, लोकांसाठी व्यापक स्तरावर काम करण्याची त्यांची नेहमीच इच्छा राहिली आहे. नोकरी, कुटुंब, समाजसेवा आणि क्रिकेटचा छंद या सर्व जबाबदाऱ्यांत समतोल साधत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
प्रशासकीय सेवेत काम करताना शांत, सुस्वभावी, उपक्रमशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सहायक आयुक्त समाजकल्याण या प्रतिष्ठित पदावर राज्यात प्रथम क्रमांकाने निवड होणे हे त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फलित ठरले. असल्याने परिसरातील युवकांसाठी एक आदर्श ठरतील असे मत व्यक्त करत या परिसरातील मित्र परिवार भास्कर तलांडे प्रकाश कंबगोणीवार, अरविंद परकीवार, महादेव आत्राम, प्रमोद केकरलावार, मधुकर गोंगले, सुरेश मोतकूरवार,नामदेव पेंदाम,नितीन मोतकूरवार,सतीश मुद्रकोल,संजय पोरतेट व वर्ग मित्राकडून शुभेच्छा व्यक्त करत आनंद व्यक्त केले आहे.

