2025 – आदिवासी संस्कृतीचा अभिमानाचा सोहळा.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
नागपूर
या वर्षी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या “Tribal Culture Show 2025” मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील विविध आदिवासी जमातींनी सहभाग नोंदवून पारंपरिक कला, संस्कृती आणि परंपरेचा भव्य सोहळा साकारला.
या विशेष कार्यक्रमात मनीषा मडावी (उईके) यांनी परीक्षक (Judge) म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.
मात्र, या शोशी त्यांचा संबंध फक्त परीक्षक म्हणून नसून या उपक्रमाची मूळ प्रेरणादात्री आणि संस्थापक म्हणूनही त्यांनी या शोची पहिली सुरुवात केली होती.
मनीषा मडावी यांनी सांगितले की, “या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी समाजाची राहणीमान, परंपरा आणि संस्कृती जगासमोर आणणे हा होता.”
त्यांच्या या विचारांना व्यापक प्रतिसाद मिळत असून, या सांस्कृतिक चळवळीची सुरुवात 9 ऑगस्ट 2023 जागतिक आदिवासी दिनी गडचिरोली येथे झाली आणि पुढे ती चंद्रपूर, तेलंगणा, उमरेड, नागपूर अशा विविध ठिकाणी पोहोचली.
नागपूर येथे झालेल्या 2025 च्या शोमध्ये तब्बल 45 आदिवासी जमातींनी सहभाग घेतला.
प्रत्येक जमातीने त्यांच्या पारंपरिक नृत्य, लोककला, वस्त्रसंस्कृती, खाद्यसंस्कृती आणि परंपरांचे उत्कृष्ट दर्शन घडवले.
ज्या प्रदेशात आदिवासी समाज वास्तव्य करतो, त्या त्या भागातील संस्कृतीचे दर्शन या मंचावर साकारले गेले.
मनीषा मडावी म्हणाल्या —
> “आज मला अत्यंत अभिमान वाटतो की, हळूहळू आदिवासी संस्कृती जगासमोर उभी राहत आहे. ही फक्त परंपरा नाही, ही आपली ओळख आहे. आणि या ओळखीच्या जतनासाठी प्रत्येक आदिवासी युवक-युवतीने पुढे यावे.”
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, जीवनपद्धती आणि सांस्कृतिक वारसा अधिक दृढ होऊन समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे.

