अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) सावनेर शाखेने २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट लघु शाखा’ हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. सोलापूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र आय.एम.ए राज्य परिषदेमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आय.एम.ए सावनेरच्या वतीने २०२४-२५ चे अध्यक्ष डॉ. विलास मानकर, आय.एम.ए. सावनेर चे स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर डॉ. विजय धोटे आणि डॉ. ज्योत्स्ना धोटे यांनी हा गौरवशाली पुरस्कार स्वीकारला. सावनेर शाखेच्या सातत्यपूर्ण, उपयुक्त आणि समाजाभिमुख कार्याची राज्य पातळीवर घोषित झालेली ही मोठी दखल आहे.
२०२४-२५ मध्ये डॉ. विलास मानकर – अध्यक्ष, डॉ. स्मिता भुडे – उपाध्यक्ष, डॉ. परेश झोपे – उपाध्यक्ष, डॉ. अमित बाहेती- सचिव, डॉ. प्रवीण चव्हाण -कोषाध्यक्ष, डॉ. शिवम पुण्यानी – सहसचिव या पदावर कार्यरत होते आणि कार्यकारिणी सदस्य मध्ये डॉ. करुणा बोकडे, डॉ. शरद डोले , डॉ. निलेश कुंभारे, डॉ. आशिष चांडक व डॉ. जीवतोडे यांनी उत्कृष्ठ कार्य केले.
गेल्या वर्षभरात आय.एम.ए. सावनेरने आरोग्य क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. विविध आरोग्य तपासणी शिबिरे, महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम, डायबेटीस व रक्तदाब जनजागृती मोहीम, शालेय आरोग्य तपासणी, योगदिवस उपक्रम, तसेच सामाजिक आरोग्य विषयक मार्गदर्शन असे अनेक बहुआयामी प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडले. ग्रामीण व शहरी परिसरात राबवलेल्या या उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक जागरूकता पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाखेने केले.
आय.एम.ए. सावनेरचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यातील एकात्मता, कार्यनिष्ठा आणि सेवा भावामुळेच हा महत्त्वाचा यशाचा टप्पा गाठता आला. शाखेने केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरते काम मर्यादित न ठेवता समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवला. आरोग्य विषयक तज्ज्ञ मार्गदर्शन, जनजागृती मोहीम आणि नागरिकांशी थेट संवाद यामुळे सावनेर शाखेची प्रतिमा अधिक बळकट झाली.
हा पुरस्कार सावनेर शाखेच्या कार्यक्षम नेतृत्वाचा आणि सर्व सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. समाजाच्या आरोग्यवृद्धीसाठी, विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य सुविधा आणि माहिती पोहोचवण्याच्या दिशेने पुढील काळातही अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प आय.एम.ए. सावनेरने व्यक्त केला आहे. या पुरस्कारामुळे शाखेला प्रेरणा मिळून आणखी प्रभावी आरोग्य उपक्रम राबवता येतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

