मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
अहेरी: तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या राजाराम –
गोलाकर्जी या 6 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या मार्गाच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
*जीवघेणे खड्डे मुळे अपघातांची शक्यता.*
राजाराम – गोलाकर्जी हा मार्ग आलापल्ली सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाला जोडतो.
चिरेपल्ली, कोरेपल्ली, छल्लेवाडा व राजाराम परिसरातील वाहनधारक व नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालय जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते, तसेच म. रा. प. महामंडळाच्या एसटी (बस) दांमरचा व छल्लेवाडा या दोन एसटी बसफेऱ्याही याच रस्त्यावरून धावतात.
हा रस्ता जवळपास 5 ते 6 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आला होता. मात्र, इतक्या कमी कालावधीत रस्त्यात मोठेमोठे खड्डे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वेळा लहानमोठे अपघातही घडल्याची माहिती नागरिकांनी दिली..
*झुडपांचा वेढा हे अपघाताला आमंत्रण*
खड्ड्यांसोबतच या रस्त्यावर दुसरी मोठी समस्या म्हणजे रायगट्टा गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांचा विळखा. रस्ता आधीच अरुंद आहे, त्यातच रस्त्यावर आलेल्या झुडपांमुळे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नाहीत.
विशेष म्हणजे रायगट्टा ते राजाराम गावांदरम्यान रस्त्याच्या मध्ये मोठे खड्डे आणि दोन्ही कडेला झुडपांचा वेढा असल्याने दुचाकीस्वार रस्त्यावरून जाताना समोरून चारचाकी वाहन आल्यास दुचाकीस्वाराला रस्त्यावर जागाच उरत नाही परिणामी अपघात होण्याची शक्यता असते. खड्डेमय, अरुंद रस्ता आणि दुतर्फा झुडपांचा विळखा या दुहेरी समस्येमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
*संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष*
या महत्त्वाच्या मार्गाची झालेली दुरवस्था आणि वाढलेल्या झुडपांकडे संबंधित विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
या मार्गाची तातडीने पक्की दुरुस्ती करावी आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे त्वरित कापून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी या भागातील वाहनधारक व नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन अपघातांचा धोका टाळावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

