नियोजन सभेला माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांची उपस्थिती; विविध समित्यांद्वारे तयारीला वेग.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी (गडचिरोली):
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ चे ‘जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन’ अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. ३ ते ६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘डॉ. होमी जहांगीर भाभा विज्ञान नगरी’ (अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा वांगेपल्ली अहेरी ) येथे हे प्रदर्शन रंगणार आहे.
या भव्य आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी १ जानेवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा वांगेपल्ली येथे नियोजनाची महत्त्वाची सभा पार पडली. यावेळी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
असा असेल प्रदर्शनाचा कार्यक्रम:
* ३ जानेवारी: सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान आलापल्ली येथे ‘विज्ञान दिंडी’ (क्रीडा संकुल ते राणी दुर्गावती विद्यालय).
* ४ जानेवारी: सकाळी अहेरी येथे विज्ञान दिंडी, तर दुपारी प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा. त्यानंतर व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
* ५ जानेवारी: विज्ञान प्रतिकृतींचे मूल्यमापन व प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. सायंकाळी व्याख्यानमाला व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
* ६ जानेवारी: सकाळी प्रश्नमंजुषा स्पर्धा, दुपारी खुले प्रदर्शन आणि त्यानंतर समारोपीय बक्षीस वितरण समारंभ पार पडेल.
नियोजन सभेला मान्यवरांची उपस्थिती
या सभेला माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अमरसिंह गेडाम,गटशिक्षणाधिकारी अहेरी सुनील आईंचवार, प्राचार्य नरेंद्र भोयर, प्राचार्य किशोर पाचभाई, प्राचार्य लोणबले, प्राचार्य शाहिद शेख, प्राचार्य डांगेवार मॅडम, विस्तार अधिकारी भारती रामगीरवार, चिलविलवार सर, पुरखलवार सर यांच्यासह तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
> “जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा यासाठी हे प्रदर्शन एक मोठे व्यासपीठ आहे. या प्रदर्शनात जास्तीत जास्त शाळांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा.”
> — वासुदेव भुसे (शिक्षणाधिकारी, माध्यमिक, गडचिरोली)
>

