मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
अहेरी (गडचिरोली): “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM)” या संकल्पनेवर आधारित ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप 6 जानेवारी रोजी वांगेपल्ली येथे अत्यंत उत्साहात पार पडला. अहेरीकरांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या या प्रदर्शनातून जिल्हाभरातील बाल वैज्ञानिकांनी आपल्या कल्पक प्रयोगांतून भविष्यातील प्रगत भारताची झलक दाखवून दिली.
विज्ञान नगरीत कल्पकतेचा अविष्कार
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जानेवारी ते ६ जानेवारी २०२६ या कालावधीत वांगेपल्ली येथील ‘डॉ. होमी जहांगीर भाभा विज्ञान नगरी’ (शासकीय निवासी शाळा) येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
चार दिवस चाललेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी शेती, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य क्षेत्रातील गंभीर समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रभावी उपाय मांडले. ग्रामीण भागातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, हा या प्रदर्शनीचा मुख्य हेतू यशस्वीरीत्या साध्य झाला.
*मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा*
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम होते. त्यांनी विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा आणि नाविन्यपूर्ण विचारांचे भरभरून कौतुक केले. तर, प्रमुख बक्षीस वितरक म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार दीपक दादा आत्राम यांनी, “भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी अशा व्यासपीठांची नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, योजना शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी वैभव बारेकर (समग्र शिक्षा), अमरसिंह गेडाम (माध्यमिक), विवेक नाकाडे (प्राथमिक), अहेरीचे गटविकास अधिकारी गणेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार, परसा मॅडम (गडचिरोली), दोंतुलवार सर (सिरोंचा), बुरुडकर सर (एटापल्ली) आणि मुख्याध्यापिका डांगेवार मॅडम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
*उत्कृष्ट नियोजन आणि सांस्कृतिक मेजवानी*
प्रदर्शनाच्या निमित्ताने ३ आणि ४ जानेवारी रोजी आलापल्ली व अहेरी येथे काढण्यात आलेल्या **’विज्ञान दिंडी’**मुळे संपूर्ण परिसर विज्ञानमय झाला होता. ४ व ५ जानेवारीच्या संध्याकाळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रदर्शनादरम्यान करण्यात आलेली चोख भोजन व निवास व्यवस्था पाहून शिक्षक आणि बाल वैज्ञानिकांनी समाधान व्यक्त केले.
> “अनेक वर्षांनंतर अहेरीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन करू शकलो, याचा मनस्वी आनंद आहे,” अशा भावना व्यक्त करत शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांनी सर्व सहकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
>
*आता लक्ष्य ‘राज्यस्तरीय’ प्रदर्शनाकडे!*
जिल्हास्तरावर निवड झालेल्या अकरा विजेत्या विद्यार्थ्यांची आता नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. हे विद्यार्थी तिथे गडचिरोली जिल्ह्याच्या वैज्ञानिक प्रगतीची चुणूक दाखवतील.

